उत्तर कोरियात या कारणाने लेदर जॅकेट वापरास बंदी

उत्तर कोरिया म्हटले कि तेथील अजब आणि विचित्र कायदे आणि हुकुमशहा किंम जोंग उन आठवतो. येथील नागरिकांना अतिशय दहशतीखाली जीवन जगावे लागते आणि स्वतंत्र विचार करणे, सार्वजनिक ठिकाणी त्याबद्दल बोलणे याचा तर संबंधच येत नाही. असे अनेक विचित्र नियम पाळले जात असलेल्या या देशात आता लेदर जॅकेट विक्री, खरेदी आणि वापर यावर बंदी आली असून येथील पोलीस दुकानातून, घरातून अशी जॅकेट जप्त करू लागले आहेत.

यामागचे कारण अजब आहे. अश्या लेदर जॅकेटची येथील तरुणवर्गात मोठी क्रेझ आहे आणि चीन मधून अशी जॅकेट येथे मोठ्या प्रमाणावर आयात होत होती. हुकुमशहा किम जोंग उन याने २०१९ मध्ये एका कार्यक्रमात असे काळ्या रंगाचे लेदर ट्रेन्च कोट जॅकेट घातले होते आणि या कार्यक्रमाचे फुटेज नॅशनल टीव्ही वरून झाले होते. येथील नागरिकांना हे जॅकेट आवडले आणि त्याची मागणी वाढू लागली. किमच्या बहिणीने सुद्धा एकदा असे जॅकेट घातले होते. पण सर्वसामान्य नागरिकांनी ते वापरणे म्हणजे किम जोंग उनची कॉपी करणे किंवा त्याचा अपमान करणे असा अर्थ लावून सामान्य नागरिकांना अशी जॅकेट वापरण्यावर बंदी घातली गेली असे समजते.

एका नागरिकाने रेडीओ ‘फ्री आशिया’ वर बोलताना सांगितले नॉर्थ कोरियामध्ये प्रभावशाली लोकांची खास स्टाईल म्हणून या लेदर जॅकेटचा समावेश झाला आहे. असे जॅकेट घालणारी व्यक्ती शक्तिशाली असल्याचा संदेश दिला जात आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक ते घालू शकणार नाहीत. या नव्या फतव्यामुळे युवा पिढी नाराज झाली आहे.