मध्येच भाषण विसरले बोरिस जोन्सन, तोंडाने काढले वाहनांचे आवाज

भाषण करण्याची वेळ कधी आणि कोणावर येईल हे सांगता येत नाही. पण साधारण नेते मंडळी भाषणे झोडण्यात तरबेज असतात. आता कधी कधी तेही भाषण विसरतात आणि दुसरेच काही बोलून वेळ मारून नेतात. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जोन्सन यांच्याबाबतील हा प्रकार नुकताच घडला. बोलता बोलता बोरिस त्यांचे भाषण विसरले आणि मग त्यांनी चक्क तोंडातून विविध वाहनांचे आवाज काढून दाखवले आणि मध्येच लहान मुलांच्या थीम पार्कवर काय काय मजा केली याचेही वर्णन केले.

हा सगळा प्रकार बोरिस २२ नोव्हेंबरच्या एका कार्यक्रमात भाषण करत असताना घडला. ब्रिटनला अधिक इकोफ्रेंडली देश कसे बनविता येईल या विषयावर बोरिस बोलत होते. त्यांनी सुरवात जोरदार केली आणि मध्येच पेट्रोल. डीझेल वाहनावर बोलताना त्यांनी तोंडातून चित्रविचित्र आवाज काढले. भाषण पुढे सुरु करण्याअगोदर त्यांना त्यांच्या नोट्स सापडल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी आपले भाषण कसेबसे संपविले.

सर्वात कहर म्हणजे भाषण संपविण्यापूर्वी त्यांनी अचानक लहान मुलांच्या थीम पार्क ‘पेपा पिग वर्ल्ड’ वर बोलायला सुरवात केली. एक दिवस अगोदरच बोरिस, पत्नी आणि त्यांच्या १ वर्षाच्या मुलाबरोबर या पार्क मध्ये गेले तेव्हा त्यांनी लहान मुलांच्या झोपाळ्यावर झोके घेतले होते, मुलासह खेळण्यातील गाडी चालविली होती. भाषणामध्ये त्यांनी हे सर्व वर्णन मजा म्हणून केल्याचे सांगितले मात्र ब्रिटीश नागरिकांच्या त्यावरच्या प्रतिक्रिया कडक होत्या. बोरिस नेता म्हणून रस्ता चुकले आहेत आणि आता देश चालविण्यासाठी ते फिट राहिलेले नाहीत अशी मते व्यक्त केली गेली.

बोरिस जोन्सन लवकरच भारताच्या भेटीवर येत आहेत. येथे त्यांची वर्तणूक कशी असेल या विषयी तर्कवितर्क सुरु झाले आहेत.