भारत सरकारच्या बंदी वार्तेमुळे क्रिप्टोकरन्सी बाजार कोसळला

भविष्यातील चलन म्हणून आज क्रीप्टोकरन्सी जगभर चर्चेत असताना भारतात मोदी सरकारने मंगळवारी २३ नोव्हेंबर रोजी रात्री संसदेत क्रिप्टोकरन्सी प्रतिबंध विधेयक सादर केले आणि काही वेळात क्रिप्टोकरन्सी बाजार धाराशाही झाल्याचे दिसून आले आहे. क्रिप्टोकरन्सी बाजारात आघाडीवर असलेले बीटकॉईन मध्ये २६ टक्के घट झाल्याचे समजते. बाकी क्रिप्टोकरन्सीचे दर सुद्धा कोसळले असून ही घट २५ ते ३० टक्के इतकी आहे.

क्रिप्टोकरन्सी देवघेव सेवा पुरवणाऱ्या वजीरएक्सवर सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म लाल निशाण दाखवत आहेत. क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये बुधवारी म्हणजे २४ नोव्हेंबरला सकाळी ९ पासून घसरण दिसू लागली आणि बीटकॉईन मध्ये २५ टक्के, इथेरियम २३, टीथर मध्ये२३, युएसडी कॉईन मध्ये २३ टक्के घसरण दिसली.

यामुळे भारतात बीटकॉईनची किंमत २५ टक्के घसरणीनंतर ३४,९९,४६८, इथेरीयमची किंमत २,६४,१४० वर, टीथरची किंमत ६३ रुपयांवर आली. डिजिटल करन्सीचे भविष्यातील स्थान लक्षात घेऊन केंद्र सरकार भारताची स्वतःची क्रिप्टोकरन्सी चलनात आणण्याची तयारी करत आहे परिणामी अन्य खासगी क्रिप्टोकरन्सीची देवघेव आणि व्यवसाय करण्यावर प्रतिबंध घातला जाणार आहे असे समजते. अनेक अर्थतज्ञांनी क्रिप्टोकरन्सी वर प्रतिबंध आणण्याऐवजी नियंत्रण आणावे असा सल्ला दिला आहे.

क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक जोखीमीची आहे तरीही गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर त्यात गुंतवणूक करत आहेत. याची मुख्य अडचण म्हणजे क्रिप्टोकरन्सी कुठून सुरु झाली, त्यांचे नियंत्रण कुठून आणि कसे होते याची काहीही माहिती उपलब्ध होऊ शकत नाही त्यामुळे त्यावर बंदी घालण्याचा सरकारचा विचार आहे.