भारतात येथे आहेत क्रूड तेलाचे राखीव साठे

ओपेकने कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविण्यास नकार दिल्याचा परिणाम म्हणून अमेरिका, भारत, जपान, चीन आणि ब्रिटनने देशाचे क्रूड तेलाचे राखीव साठे खोलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यानुसार अमेरिका ५ कोटी बॅरल, भारत ५५ लाख, जपान ४२ लाख बॅरल तेल विक्रीसाठी आणणार असल्याची घोषणा केली गेली आहे. भारतात कुठे आणि कश्या प्रकारे क्रूड तेल साठवले जाते आणि राखीव साठा म्हणून राखले जाते याची माहिती अनेकाना नाही.

१९९० मध्ये खाडी युद्ध सुरु झाले आणि जगावर तेल संकट आले. तेव्हा १९९८ मध्ये तत्कालीन अटल बिहारी सरकारने कच्च्या तेलाचे राखीव साठे निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. हे तेल नैसर्गिक आप्पती, युद्ध, तेल तुटवडा, किमती प्रचंड वाढल्या तर अश्या वेळी वापरता यावे हा त्यामागे उद्देश होता. अमेरिकेने अशी तयारी १९७० च्या दशकापासूनच केली होती आणि ६० कोटी बॅरलवर तेल साठवण क्षमता नेली होती.

भारताचे हे राखीव तेल साठे पूर्व व पश्चिम समुद्रकिनारी आहेत. तीन ठिकाणी भूमिगत गुहांमध्ये ३.८ कोटी बॅरल कच्चे तेल राखीव साठा म्हणून ठेवले गेले आहे. आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम, कर्नाटकातील मंगलोर आणि पुदूर येथे भूमिगत गुहात हे तेल आहे. २०१८ मध्ये मोदी सरकारने ओरिसाच्या चंडीखोल आणि कर्नाटकच्या पुदूर येथे जास्तीचे तेल भांडार तयार केले आहे. जमिनीखालील खडकात खोदलेल्या गुहांमध्ये ही साठवण केली जाते. भारताच्या तेलाच्या एकूण गरजेपैकी ८३ टक्के तेल आयात केले जाते आणि ही आयात प्रामुख्याने खाडी देशातून होते. देशात सध्या असलेल्या राखीव तेल साठ्यापैकी ५५ लाख बॅरल तेल बाहेर काढले जाणार असून त्यातून देशाची १३ दिवसांची तेल गरज भागू शकणार आहे.