परमवीर सिंग यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप

फरार घोषित झालेल्या परमवीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने अटक करण्यावर प्रतिबंध घातल्यावर परमवीर सिंग यांनी टेलिग्राम सोशल मिडिया प्लॅटफॉर्म वर ते चंदिगढ येथे असून लवकरच मुंबईत येत असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान महाराष्ट्र पोलीस विभागातील निवृत्त पोलीस अधिकारी समशेर खान पठाण यांनी मुंबईचे माजी पोलीस कमिशनर परमवीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केला असून त्यासंदर्भात मुंबई पोलिसात चार पानी अर्ज दिला आहे.

समशेरसिंग पठाण यांच्या म्हणण्यानुसार मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यात जिवंत पकडल्या गेलेल्या अजमल कसाब याचा फोन मिळाला होता तो परमवीर सिंग यांच्याकडे दिला गेला पण त्यांनी तपास कामात हा फोन दिलाच नाही. पंचनाम्यात कुठेही असा फोन सापडल्याचा उल्लेख आला नाही आणि त्यामुळे ज्या फोन वरून कसाबला पाकिस्तानातून संदेश मिळत होते तो महत्वाचा दुवा पोलिसांना मिळू शकला नाही. हा फोन तपास अधिकार्यांना दिला गेला असता तर कसाब बरोबर अन्य दहशतवादी आणि त्यांचे हँडलर्स कोण आहेत याची महत्वाची माहिती हाती लागू शकली असती.

पठाण सांगतात, ते या काळात म्हणजे २००७ ते २०११ मध्ये पायधुनी पोलीस स्टेशनवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते आणि त्यांचे बॅचमेट एन.आर.माळी डीबी मार्ग पोलीस स्टेशनवर वरिष्ठ अधिकारी होते. ही दोन्ही स्टेशन मुंबई झोन दोन मध्ये येतात. २६/११ हल्ल्यात अजमल कसाबला गिरगाव चौपाटीवर पकडले तेव्हा माळी तेथे होते आणि फोनवरून बोलताना त्यांनी कसाब कडे फोन मिळाल्याचे सांगितले होते. त्यावेळी घटनास्थळी जे मोठे अधिकारी आले त्यात एटीएसचे तत्कालीन प्रमुख परमवीरसिंग हेही होते. हवालदार कांबळे यांनी कसाबचा फोन परमवीर सिंग यांच्याकडे सोपवला पण त्यांनी तो तपास करणाऱ्या अधिकार्यांना दिलाच नव्हता. कारण जेव्हा पंचनामे तपासले गेले तेव्हा फोन मिळाल्याचा उल्लेखच केला गेला नव्हता असे नंतर दिसून आले. त्यावेळी सुद्धा पठाण यांनी या बाबत त्यावेळच्या पोलीस प्रमुखांना सूचना दिली पण त्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही असे पठाण यांचे म्हणणे आहे.