अक्षय कुमारच्या आगामी ‘अतरंगी रे’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज


बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुषचा ‘अतरंगी रे’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर काल रिलीज करण्यात आले होते. ते पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अशातच आता चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून तो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

३ मिनिटे आठ सेकंदाच्या ‘अतरंगी रे’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सारा आणि धनुषने अनेकांची मने जिंकली आहेत. ट्रेलरच्या सुरुवातीला धनुषचे अपहरण करुन साराशी लग्न करण्यासाठी आणण्यात आल्याचे दाखवले आहे. पण सारा लग्नाला तयार नसते. साराचे लग्न कुटुंबीय जबदरस्तीने धनुषशी लावून देतात. त्यानंतर सारा आणि धनुष दिल्लीला जातात. तेव्हा त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण होते आणि त्याच वेळी अक्षय कुमारची एण्ट्री होते. साराचे अक्षयवर प्रचंड प्रेम असते. एकंदरीत ट्रेलर पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

‘अतरंगी रे’ या चित्रपटाचे यापूर्वी तीन टीझर पोस्टर समोर आले होते. दिग्दर्शक आनंद एल राय यांनी या पोस्टरच्या माध्यमातून आपल्या चित्रपटातील तीन प्रमुख व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर मांडल्या होत्या. अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष यांचा बहुचर्चित आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत होता. आता चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत आहे. आतापर्यंत १ लाखपेक्षा जास्त लोकांनी हा ट्रेलर पाहिला आहे.

दिग्दर्शक आनंद एल रायसोबतचा ‘अतरंगी रे’ हा दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषचा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी या दोघांनी ‘रांझना’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. भूषण कुमार, कलर येलो प्रॉडक्शन आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणाला २०२० मध्ये सुरुवात झाली होती.