खेळाडूंना हलाल मांस अनिवार्य करण्याच्या बातमीवर बीसीसीआयने दिले स्पष्टीकरण


नवी दिल्ली – सोशल मीडियावर टीम इंडियातील खेळाडूंना केवळ हलाल मांस खाणे अनिवार्य केल्याच्या कथित वृत्ताने जोरदार चर्चा सुरू झाली. बीसीसीआयने कानपूर येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियासाठी डाएट प्लान दिले आहे आणि त्यात हलाल मांस अनिवार्य करण्यात आल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. केवळ हलाल मांस अनिवार्य करण्यात आल्यामुळे सोशल मीडियामध्ये चाहत्यांनी बीसीसीआयवर टीकेची झोड उठवली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंदू आणि शीख लोक झटका मांस खातात, तर मुस्लिम लोक हलाल मांस खाणे पसंत करतात. त्यामुळे भारत मुस्लिम देश आहे का? असा सवाल विचारण्यात आला आहे. यावर भारतीय क्रिकेट बोर्डाने स्पष्टीकरण दिले आहे. अशाप्रकारचा कोणताही डायट प्लॅन खेळाडूंसाठी तयार केले नसल्याचे स्पष्टीकरण बीसीसीआयने दिले आहे.

ट्विटरवर मंगळवारी रात्रीपासून #BCCI Promotes Halal हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. यावरुन बीसीसीआयवर टीकेची झोड उडत आहे. यावर एबीपी न्यूजला बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने स्पष्टीकरण दिले आहे. बीसीसीआय अधिकारी एबीपीशी बोलताना म्हणाले की, खेळाडूंच्या डाएट प्लॅनबाबतचे कोणतेही सर्कुलर बोर्डाकडून जारी करण्यात आलेले नाही. शाकाहारी, मांसाहारी अथवा हलाल मांस खायचे की नाही, ही खेळाडूंची वैयक्तिक पसंद आहे. याबाबतच्या कोणत्याही सूचना बोर्डाकडून जारी केलेल्या नाहीत.

#BCCI_Promotes_Halal हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे, भारतीय क्रिकेट बोर्डावर ज्यातून ताशेरे ओढले जात आहेत. भारतीय खेळाडूंसाठी बीसीसीआयने नवीन डाएट प्लान तयार केल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. या डाएटचे खेळाडूंना काटेकोरपणे पालन करावे लागणार असून खेळाडूंनी केवळ हलाल मांस खावे, असे यात म्हटले होते. त्यानंतर नेटकऱ्यांनी बीसीसीआयवर निशाणा साधला. वास्तविक भारतीय क्रिकेट संघासाठी बीसीसीआयने नवीन डाएट प्लान तयार केल्याची बातमी दोन दिवसांपूर्वी आली होती. या डाएट प्लॅनचे क्रिकेटपटूंना काटेकोरपणे पालन करावे लागणार असून खेळाडूंनी केवळ हलाल मांस खावे, असे यात म्हटले होते.

दरम्यान उद्यापासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी मालिकेची सुरुवात होत आहे. न्यूझीलंड आणि भारत दोन्ही संघ कानपूरमध्ये पोहचले आहेत. दोन्ही संघांनी सराव सुरु केला आहे.