धक्कादायक प्रकार; पुण्यातील IB गेस्ट हाऊसमध्ये परिचारीकेचे अंघोळ करताना चित्रिकरण


पुणे – पुण्यातील ‘आयबी गेस्ट हाऊस’मध्ये राहत असणाऱ्या परिचारीकेचे आंघोळ करतानाचे फोटो व व्हिडीओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे फोटो येथील सुरक्षारक्षकानेच काढल्याचे समोर आले असून, त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. 36 वर्षीय महिलेने याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली असून तो सुरक्षारक्षक आहे. अशोक तुकाराम चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा धक्कादायक प्रकार रविवारी मध्यरात्री घडला आहे. महिलेने सोमवारी सकाळी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.

एका नामांकित सरकारी रुग्णालयात तक्रारदार महिला या परिचारीका म्हणून कर्तव्यावर आहेत. सध्या त्या कोरोना ड्यूटीवर असल्यामुळे त्यांची आयबी गेस्ट हाऊस येथे राहण्याची सोय करण्यात आली आहे. त्या सोमवारी मध्यरात्री कामावरून गेस्ट हाऊसमध्ये आल्या. कोरोना ड्यूटी केल्यामुळे त्या आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेल्या. यादरम्यान ड्यूटीवर असलेल्या सुरक्षारक्षकाने त्यांच्या बाथरूमच्या खिडकीजवळ येत त्यांचे आंघोळ करतानाचे फोटो काढले. त्यांना याबाबत शंका आल्यामुळे त्यांनी तात्काळ बाहेर येऊन पाहणी केली. पण, त्यांना कुणी सापडले नाही. त्यांनी याबाबत बंडगार्डन पोलीसांकडे सकाळी तक्रार केली होती.

महिलेने दिलेल्या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांर्भियाने दखल घेत तपासाच्या सूचना केल्या. त्यानुसार पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यात सुरक्षारक्षक हा प्रकार करत असताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली, असता त्याने चित्रीकरण केल्याची कबूली दिली. त्याला अटक करण्यात आली असून बंडगार्डन पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.