केंद्रीय मंत्रिमंडळाचे तीन कृषि कायदे मागे घेण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब


नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी कृषि कायदे मागे घेत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. पण जोपर्यंत संसदेत प्रस्ताव मंजूर होत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. पण तीन कृषि कायदे मागे घेण्याचा प्रस्ताव आज केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतही मंजूर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झालेला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत विधेयकाला मंजुरी मिळाली, असून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये तीन कृषि कायदे रद्द करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात येणार आहेत. त्यानंतरच मोदी सरकारने लागू केलेले तीनही कृषी कायदे घटनात्मक प्रक्रियेनुसार, रद्द होतील. आज या तीनही कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर मोदींच्या कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आला.

तीनही कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. आता 29 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच कृषि कायदे मागे घेण्याची घटनात्मक प्रक्रिया सुरु होईल. ज्याप्रमाणे एखादा नवा कायदा तयार करुन संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर मांडून, तो मंजूर करुन घेतला जातो, त्याचप्रमाणे एखादा लागू करण्यात आलेला कायदा मागे घेतला जातो, तो रद्द केला जातो.

महत्त्वाची बाब म्हणजे, जुना कायदा हा नवा कायदा करुनच रद्द केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत पंतप्रधानांच्या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी तीन कायद्यांसाठी तीन स्वतंत्र विधेयके किंवा तिन्हींसाठी एक विधेयक 29 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात लोकसभा किंवा राज्यसभेत मांडले जाईल. हे विधेयक मांडण्यात आल्यानंतर, एका सभागृहाने आणि नंतर दुसऱ्या सभागृहाने चर्चा किंवा चर्चा न करता मंजूर केल्यानंतर ते राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवले जाईल.

तीनही कृषी कायदे राष्ट्रपतींची मंजुरी मिळताच रद्द केले जातील. विधेयक मंजूर होण्यासाठी किती वेळ लागेल, हे सरकारच्या प्राधान्यांवर अवलंबून असेल. तथापि, पंतप्रधानांच्या घोषणेवरून याचा अंदाज लावला जाऊ शकतो की, दोन दिवसांत हे विधेयक दोन्ही सभागृहांतून मंजूर करून राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवले जाईल. अशा परिस्थितीत पहिल्या आठवड्यातच तीनही कृषि विषयक कायदे मागे घेतले जातील, अशी अपेक्षा आहे.