गद्दारीतून जन्म झालेल्या राणेंनी गद्दारी बद्दल बोलू नये; शिवसेना आमदार वैभव नाईकांचा नारायण राणेंवर प्रहार


सिंधुदुर्ग – सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या निवडणुका नाहीत. पण सध्या जिल्ह्यातील राजकीय वातावरण चागंलेच तापलेले आहे. एकीकडे सभांचा सपाटा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लावला आहे. यामध्ये ते विरोधकांवर टीकेची झोड उडवत आहेत. तर त्यांनी स्वपक्षीय कार्यकर्त्यांनाही फैलावर घेतले आहे. गद्दारी केली, तर मी सहन करणार नसल्याचा इशारा केंदीय मंत्री नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी राणेंच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. गद्दारीतून जन्म झालेल्या राणेंनी गद्दारी बद्दल बोलू नये, भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना मुलांसाठी राणे धमक्या देत आहेत, पण कार्यकर्त्यांनी घाबरू नये, असे वक्तव्य वैभव नाईक यांनी केले आहे.

गद्दारी केली, तर मी सहन करणार नाही. गद्दारी माझ्याकडे चालत नाही. पद मागा मी देईन, पण गद्दारी सहन करणार नाही. आपल्याच लोकांना गद्दारी करून पाडणार असाल, तर तसे चालणार नाही, असा सज्जड दम सावंतवाडी येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नारायण राणेंनी कार्यकर्त्यांना दिला. राणेंच्या या वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक झाले असून गद्दारी करणाऱ्यानी गद्दारीची भाषा करू नये, असा खोचक टोला जॉईंट किलर वैभव नाईक यांनी नारायण राणे यांना लगावला आहे.

आमदार वैभव नाईक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वतःच्या कार्यकत्यांबरोबर गद्दारी करून राणेंनी सत्तेसाठी भाजपमध्ये प्रवेश केला, अशी टीका केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे मेळावे घेऊन भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांना धमकावत आहेत. पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवडणुकांमध्ये गद्दारी केल्यास सोडणार नाही, बघून घेईन, अशा भाषेत त्यांना धमकी देत आहेत. पण वेळोवेळी नारायण राणेंनीच गद्दारी केली असल्यामुळे गद्दारी या विषयावर कार्यकर्त्यांना धमकावण्याचा राणेंना नैतिक अधिकार नसल्याचा टोला आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंना लगावला आहे. शिवसेनेबरोबर गद्दारी करत नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी काँग्रेसमध्येही गद्दारी केली. त्यानंतर स्वतःचा स्वाभिमान पक्ष काढला. त्याला वर्ष होण्याअगोदर स्वतःच्या कार्यकत्यांबरोबर गद्दारी करून सत्तेसाठी भाजपमध्ये दाखल झाले. आपल्या दोन्ही मुलांच्या राजकीय पुनर्वसनासाठी धडपडत आहेत. पण जिल्ह्यातील येणाऱ्या निवडणुकीत जनता व कार्यकर्ते कोणाबरोबर आहेत, हे स्पष्ट होईल, असे वैभव नाईक यांनी म्हटले आहे.