राज्यातील पहिली ते चौथी शाळा सुरु करण्याबाबत राजेश टोपे यांचे मोठे वक्तव्य


मुंबई – राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालल्यानंतर सर्व गोष्टींमध्ये हळूहळू शिथिलता येत आहे. महाविद्यालये, पाचवी ते दहावी शाळा सुरु झाल्यानंतर, आता पहिली ते चौथी शाळा सुरु होणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. टोपे म्हणाले की, पहिली ते चौथी इयत्तेतील सर्व विद्यार्थी शाळेत आले पाहिजेत. त्यांचे लसीकरण केले पाहिजे. 12 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करावे हा मुद्दा मांडला गेला आहे. पहिली ते चौथी शाळा सुरु करायला परवानगी द्यावी, असेही म्हटले आहे. उद्या कॅबिनेट आहे, या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय होईल, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. ना हरकत सार्वजनिक आरोग्य विभागाने दिल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

राजेश टोपे पुढे म्हणाले की, आता 50% परवानगी नाट्यगृह, सिनेमागृहांना दिली आहे. परिस्थितीत अजून सुधारणा झाली तर निर्बंधांबाबत सकारात्मक विचार करता येईल. मुख्यमंत्री त्यावरही निर्णय घेतील. त्यांनी म्हटले की, सध्या लग्नसराईमुळे गर्दी वाढत आहे. यात सोशल डिस्टन्स दिसत नाही. बिनधास्तपणा जाणवत आहे. ही मानसिकता घातक आहे. जागरूक राहिले पाहिजे. दुसऱ्या लाटेत आपले नुकसान झाले असल्याचेही टोपे म्हणाले.

आता राज्यात 700 ते 800 कोरोनाबाधित सापडत आहेत. त्याचबरोबर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98 टक्क्यांवर आले आहे. लहान मुले आजारी पडल्याचे प्रमाण जास्त नाही. त्यामुळे पालकांनी चिंता करण्याचे कारण नसल्याचेही टोपे म्हणाले. ते बूस्टर डोससंदर्भात बोलताना म्हणाले की, आता लसी देऊन एक वर्ष झाले आहे. तर त्यांना बूस्टर डोस देण्यात यावा, अशी मागणी केंद्राकडे केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या तब्येतीविषयी माहिती देताना ते म्हणाले की, त्यांची तब्येत चांगली आहे. फिजिओथेरपी सुरू आहे. ते पूर्ण करुन कामाला लागावे, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. ते उद्या कॅबिनेटला व्हिडीओ कॉन्फरेंसिंगद्वारे उपलब्ध असतील.