मुंबईकरांपेक्षा वीक आहे पुणेकरांची मराठी; चित्रा वाघ


पुणे – आज पुण्यात पत्रकारपरिषदेत राज्यातील महिला व मुलींवरील अत्याचारांच्या वाढलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडी सरकारवर भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी जोरदार टीका केली. चित्रा वाघ यांनी काही दिवसांपूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधताना, शूर्पणखा असा उल्लेख केला होता. चित्रा वाघ यांना या टिप्पणीबद्दल माध्यमांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, यावेळी बोलताना त्यांनी मला असे वाटते की मुंबईकरांपेक्षा पुणेकरांची मराठी वीक असल्याचे देखील म्हटले.

चित्रा वाघ यांनी या मुद्य्यावर बोलताना सांगितले की, शूर्पणखा म्हणजे कुणाचे नाव थोडीच शूर्पणखा आहे. मी तर उपमा दिली होती की रावणाला मदत करणारी शूर्पणखा नको. रावण तर खूप फिरत आहेत. तीन तर रावण मीच तुम्हाला सांगितले. असे खूप असल्यामुळे त्यामुळे त्यांना मदत करणारी शूर्पणखा नको. हे काय कुणा एखाद्या व्यक्तिला म्हटलेले नाही. कुणाचे नाव शूर्पणखा आहे का? मी असेच म्हटले.. की कुणी पण बसवा शूर्पणखा बसवू नका. तीन पक्षाचे सरकार आहे, तुम्ही कुणालाही बसवा पण शूर्पणखेला बसवू नका. शूर्पणखा काय आहे? रावणाला मदत करणारी ती शूर्पणखा. मला जे माहिती आहे. बहीण जरी असेल आणि चुकीचा कामात रावणाला मदत करत असेल, तर ते आम्हाला कसे काय चालेल? म्हणून मी म्हटले. कुणाचे नाव शूर्पणखा असेल किंवा पुण्यामध्ये ठेवले असेल तर मला कळवा.

तसेच, आता तर कुठे बॅटींग सुरू झाली आहे, ती आता शिकू द्या, समजू द्या. नंतर बोलू की आम्ही. शूर्पणखा आहे की नाही हे येणाऱ्या दिवसात समजेल. ते नाही बोलले तरी आम्ही आहोतच. मला हे म्हणायचे आहे की अजुन कामकाज काही कुठे दिसले नाही. एकदा जर एखाद्याला कुठले काम दिले, तर त्याला शिकायला त्याला दोन महिने दिले पाहिजे. त्यांनी काम करू देत. तिथे शूर्पणखा नको म्हणजे रावणाला मदत करणारी नको. असे माझे म्हणणं आहे. तिथे कोण बसले आहे हे महत्वाचे नाही. ते संविधानिक पद आहे. त्या संविधानिक पदाची गरीमा मला माहिती आहे, मी महिला आयोगामध्ये काम केले आहे.

ते पद अतिशय आदराचे आणि मानाचे आहे. म्हणूनच मी म्हटले की अशा संविधानिक पदावर शूर्पणखा देऊ नका, म्हणजेच रावणाची बहीण देऊ नका, जी रावणाला मदत करते आणि राज्यात तर रावणच रावण फिरत आहेत सगळ्या ठिकाणी. जर त्यांनाच मदत करणारी शूर्पणखा आली, तर राज्यातील महिलांचे काय होणार? हा त्याचा आशय असल्याचे चित्रा वाघ यांनी यावेळी स्पष्ट केले.

त्याचबरोबर जेव्हा कुठलीही महिला अधिकार पदावर जाते, त्यावेळी तिच्याकडून आमच्यासारख्या हजारो महिलांच्या अपेक्षा खूप वाढतात. त्यामुळे आम्हालाही अपेक्षा आहेत आणि मनापासून शुभेच्छा देखील आहेत. जरा त्यांना काम करू द्या. आल्या आल्या लगेच त्यांच्यावर टीका, भडीमार करुन एखाद्या महिलेला त्रास देणे बरोबर नाही. काम करू द्या, शिकू द्या नंतर पाहू. तुम्ही पण येथेच आहात आणि आम्ही देखील येथेच असल्याचेही यावेळी चित्रा वाघ यांनी बोलून दाखवले.

तर तुम्ही मगापासून महिलांचा विषय मांडत आहात, तर एका महिलेलाच तुम्ही शूर्पणखा असे म्हणतात? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधीने उपस्थित केल्यावर चित्रा वाघ यावर म्हणाल्या की, महिलेला नाही म्हटले, त्या वृत्तीला मी म्हटले. मला असे वाटते की पुणेकरांची मराठी मुंबईकरांपेक्षा वीक आहे. हे कुठल्या महिलेसाठी नाही, त्या वृत्तीसाठी आहे. आपण रावणी वृत्ती म्हणतो म्हणजे काय म्हणतो? मग आता ही शूर्पणखेची वृत्ती आहे. म्हणून मी सांगितले की रावणाची शूर्पनखा बनवू नका. मी वृत्ताला म्हटले आहे, महिला असेल आणि ती चुकीचे काम करत असेल, तर त्याचे आपण समर्थन करणार का? एक तर दोन वर्षे झाले महिला आयोगाला अध्यक्षपद दिले गेले नाही.

आम्ही बोंब मारून.. मंत्रालयाच्या गेटवर आंदोलन देखील केलं आहे आणि त्यानंतर कुठेतरी महिला आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक झाली. आमचे एवढेच म्हणणे आहे की त्या वृत्तीची कुणी महिला बसवू नका, की जी रावणांना मदत करेल. याच्या अगोदर आम्ही बघितले आहे, आम्ही पाहीले आहे, म्हणून मी सांगितले आहे की तसे करू नका. कारण, आता राज्यात महिला व मुलींवर जे अत्याचाराचे सत्र आहे, ते अतिशय गंभीर आहे. रोज कुठे ना कुठे घटना घडत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी महिला आयोगासारखे एक सशक्त भूमिका निभावणारे त्या ठिकाणी माणूस पाहिजे.