केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना कोरोना चाचण्या वाढवण्यासाठी पत्र


मुंबई – देशभरातील कोरोनाबाधितांची आकडेवारी जरी आटोक्यात येत असली तरी कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे कमी झालेला नाही. कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली, तरी आता चाचण्या कमी होत असल्यामुळे केंद्र सरकारकडून चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना चाचणी वाढवण्यावर भर देण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रासह काही राज्यांना पत्र पाठवून कोरोना चाचण्या वाढवण्याबाबत आवाहन केले आहे.

देशात रोज सरासरी 10 हजार 195 कोरोनाबाधितांची नोंद होत असतानाच चाचण्या कमी होत आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात असली तरी दुसरीकडे मोठ्या प्रमाणात लसीकरण जरी होत असले तरी जगातील काही देशांमध्ये चौथी आणि पाचवी लाट बघायला मिळत आहे. त्यामुळे चाचण्यांचा दर वाढवण्यावर भर देण्याची मागणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सचिवांनी महाराष्ट्रासह नागालॅंड, सिक्किम, केरळ, गोवा, मणिपूर, मेघालय, मिझोराम, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि लद्दाखला कोरोना चाचणी वाढवण्यावर भर देण्याचे आवाहन करत पत्र पाठवले आहे. देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव घटल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच दैनंदिन रुग्णसंख्येतही कमालीची घट पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव घटला असला तरी, धोका मात्र अद्याप टळलेला नाही. देशात काल दिवसभरात 9 हजार 283 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 437 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात एक लाख 11 हजार 481 सक्रिय रुग्ण आहेत.