वादग्रस्त वक्तव्यावरून नवाब मलिक यांनी साधला कंगना राणावतवर निशाणा!


मुंबई – कायमच आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे अभिनेत्री कंगना राणावत ही चर्चेत राहिली आहे. तिने नुकतीच दिवंगत इंदिरा गांधी याच्या ऑपरेशन ब्लू स्टारसंदर्भात केलेल्या एका वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टवरून मोठा वाद निर्माण झाला होता. तिच्याविरोधात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली असून तिला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यासंदर्भात बोलताना कंगनावर निशाणा साधला आहे. तिला दिलेली झेड प्लस सुरक्षा देखील तिला वाचवू शकत नसल्याचे नवाब मलिक यांनी म्हटल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे.

ऑपरेशन ब्लू स्टारच्या माध्यमातून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पंजाबच्या सुवर्ण मंदिरात मोठी कारवाई केली होती. कंगनाने याचसंदर्भात काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट केली होती. यामध्ये तिने सुवर्णमंदिरात केलेल्या कारवाईबाबत इंदिरा गांधी यांच्या आक्रमक भूमिकेचे कौतुक केले होते. यासंदर्भात वाद निर्माण झाल्यानंतर तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान नवाब मलिक यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना कंगनावर निशाणा साधला. कायद्यापेक्षा कुणीही वरचढ नाही. तिला केंद्राकडून पुरवण्यात आलेली झेड प्लस सुरक्षा देखील तिला वाचवू शकणार नाही, असे मलिक यांनी म्हटले आहे.


सिख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष मनजिंदर सिंग सिरसा यांच्या शिष्टमंडळाने कंगनाच्या पोस्टविषयी मुंबईच्या पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतली. तिच्या वक्तव्याबाबत सिरसाने तक्रार देखील दाखल केली आहे. त्यांनी दिल्ली पोलिसांना देखील ट्विटरवर टॅग करून तिच्याविरोधात तक्रार केली आहे. शिवाय, कंगनाला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्याची विनंती देखील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे करण्यात आली आहे.

सरकारवर आज कदाचित खलिस्तानी दहशतवादी भारी पडत असतील. पण आपण एका महिलेला विसरता कामा नये. भारताच्या अशा एकमेव महिला पंतप्रधान ज्यांनी या सगळ्यांना आपल्या पायांखाली चिरडून टाकले होते. त्यांच्यामुळे देशाला किती भोगावे लागले, हे जरी सत्य असले, तरी त्यांनी या सगळ्यांना मच्छराप्रमाणे चिरडून टाकले. त्यांच्या जिवाची पर्वा न करता. पण त्यांनी देशाचे तुकडे होऊ दिले नाहीत. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक दशके उलटल्यानंतरही आजही त्यांच्या नावाने हे लोक थरथर कापतात, असे स्टेटस कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ठेवले होते.