यामुळे निलेश साबळेने पाया पडून मागितली नारायण राणेंची माफी


‘चला हवा येऊ द्या’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी कॉमेडी शो आहे. हा कार्यंक्रम सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पात्र या शोमध्ये दाखवण्यात आले होते. त्यानंतर संपूर्ण राज्यभरात संताप व्यक्त केला गेला. नारायण राणेंची बदनामी होईल, असे पात्र रंगवण्यात आल्याचा आरोप राणेंच्या समर्थकांनी केला होता. त्यानंतर कार्यक्रमाचा सूत्रसंचालक निलेश साबळे आणि त्यांच्या टीमने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेत दिलगिरी व्यक्त केली.

राणेंच्या अधिश निवासस्थानी निलेश साबळे आणि कार्यक्रमातील काही सहकाऱ्यांनी मिळून भेट घेतली आणि नारायण राणे यांची पाया पडून माफी मागितली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘दिवाळी अधिवेशन’ या कार्यक्रमात राणे यांचे पात्र दाखविण्यात आले होते. राणेंच्या समर्थकांनी या पात्रावर आक्षेप नोंदविला होता. यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या होत्या. त्यानंतर राणेंच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी झी टीव्ही आणि निलेश साबळेला फोन करून संताप व्यक्त केला होता. त्यामुळे साबळे व टीमने राणे यांची भेट घेतली. त्यांनी राणे यांच्या ‘अधिश’ या निवासस्थानी जात दिलगिरी व्यक्त केली. यावेळी आमदार नितेश राणेदेखील उपस्थित होते. आमचा हेतू कुणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता. आमच्या टीमकडून पुन्हा अशी चूक होणार नसल्याचे निलेश साबळेने यावेळी म्हटले.