राज ठाकरेंच्या भेटीला ‘शिवतीर्थ’वर देवेंद्र फडणवीस


मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. पुन्हा एकदा मनसे-भाजप युतीच्या चर्चा फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे सुरू झाल्या आहेत. याआधी चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसे-भाजप युतीच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, युतीची चर्चा काही मुद्द्यावर एकमत न झाल्यामुळे फिसकटल्याचे म्हटले जात होते. पण, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. त्यातच राज ठाकरे यांच्या घरी देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत भेट दिली आहे. या भेटीमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस हे राज ठाकरेंचे निवासस्थान शिवतीर्थावर दाखल झाले असून. ही एक कौटुंबिक भेट असल्याचे बोलले जात आहे. पण, तसे असले तरी या भेटीला केवळ कौटुंबिक भेट बोलता येणार नाही.

भाजप आमदार आशिष शेलार यांनीही दिवाळीमध्ये राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्याआधी चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्यामध्ये नाशिकमध्ये भेट झाली होती. मनसे-भाजपमध्ये मागील दोन ते तीन महिन्यांपासून युतीची चर्चा सुरु आहे. त्यातच आता फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या घरी भेट दिल्यामुळे चर्चेला आणखी उधाण आले आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला राज ठाकरे यांनी कोरोनावर मात केली होती. त्यानंतर राज ठाकरे आपल्या नव्या घरी दिवाळीमध्ये शिफ्ट झाले. कृष्णकुंजच्या शेजारीच नवे घर राज ठाकरे यांनी बांधले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या नव्या घरी भेट दिली आहे. या भेटीत राज्यातील परिस्थिती आणि युतीवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना आणि भाजप यांची युती 2019 मध्ये तुटली. शिवसेनेने साथ सोडल्यानंतर भाजप नव्या मित्रपक्षासोबत युती करण्यास उत्सुक आहे. आगामी निवडणुकीत भाजप आणि मनसे युती होऊ शकते, अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत या युतीचा पहिला प्रयोग होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठीचा मुद्दा लावून धरणाऱ्या मनसेने हिंदुत्वाची वाट धरल्याचेही पाहायला मिळाले. हिंदुत्वाच्या विचारसरणीला मानणारा भाजपही असल्यामुळेच हिंदुत्व दोन्ही पक्षांना जोडणार समान धागा आहे. राजकारणात काहीही अशक्य नसते, त्यामुळे भविष्यात या दोन पक्षांमध्ये युतीची शक्यता नाकारता येत नाही.