भाऊ आणि कुशलच्या ‘पांडू’चा भन्नाट ट्रेलर रिलीज


विनोदाच्या दुनियेतील हुकुमी एक्के असलेले भाऊ कदम व कुशल बद्रिके मुख्य भूमिकेत असलेला ‘पांडू’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. चित्रपटाचा टीझर रिलीज होताच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. या बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित ‘पांडू’ चित्रपटाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

१ मिनिटे २२ सेकंदाच्या ‘पांडू’ चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला प्रवीण तरडे एका वेगळ्या भूमिकेत दिसत आहेत. त्यानंतर भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना हसू अनावर होईल. त्यानंतर सोनाली कुलकर्णीने अनेकांची मने जिंकली आहेत. सध्या हा ट्रेलर सोशल मीडियावर चर्चेत आहे.

दोन मित्रांची पांडू या चित्रपटाची कथा आहे. पांडू आणि महादू हे कोल्हापूरचे लोककलावंत. वगनाट्यातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे काम दोघेही करतात. एक दिवस नशिबाची अशी काही संधी चालून येते की या दोघांनाही मुंबईत नोकरी मिळते तेही हवालदाराची. पांडू तसा साधाभोळा आणि अगदी भाबडा तर महादू हा त्याच्या अगदी विपरीत चतुर आणि चाणाक्ष, दुनियादारी समजणारा. केळी विकण्याचा व्यवसाय करणारी डॅशिंग गर्ल उषामुंबईत आल्यावर पांडूंच्या आयुष्यात येते. आसपासच्या स्वार्थी आणि मतलबी दुनियेत पांडूसारखी भोळी आणि साधी माणसेही असतात या गोष्टीचे तिला कौतुकही वाटते आणि याचमुळे ती पांडूच्या प्रेमातही पडते.

झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी यांना हा चित्रपट पूर्णतः विनोदी अंगाने जाणारा असून तो प्रेक्षकांना खळखळून हसवेल आणि त्यांचा ताण दूर करेल असा विश्वास वाटतो. अवधूत गुप्ते यांच्या संगीताने सजलेल्या पांडूची गाणी सर्वत्र लोकप्रिय झालेली आहेत, बुरुम बुरुम गाण्याने २० लाख व्ह्यूज तर केळेवाली गाण्याने अवघ्या २४ तासात १० लाख व्ह्यूज मिळवले आहेत. पांडूबद्दल अधिक उत्सुकता चित्रपटाचा हा ट्रेलरही निर्माण करेल, अशी आशा चित्रपटातील कलाकारांनी व्यक्त केली. येत्या ३ डिसेंबरला हा चित्रपट राज्यभरात सर्वत्र रिलीज होणार आहे.