संपत्ती वाटपाबाबत मुकेश अंबानी करताहेत गंभीरपणे विचार

आशिया खंडातील नंबर वनचे धनकुबेर आणि रिलायंस उद्योगसमुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी आपली संपत्ती वारसांना कश्या प्रकारे मिळावी याचा गंभीर विचार करत असल्याचे समजते. संपत्ती वाटपावरून मुलांमध्ये वादविवाद उद्भवू नयेत यासाठी काय करता येईल यासाठी अनेक योजना मुकेश यांच्या विचाराधीन आहेत. त्यासाठी जगभरातील अनेक श्रीमंत घराण्यांनी त्याच्या संपत्तीच्या वाटण्या कश्या केल्या याची माहिती मुकेश घेत आहेत सांगितले जात आहे.

यामध्ये मुकेश यांना जगातील श्रीमंत कुटुंबापैकी एक वॉल्टन कुटुंबाने स्वीकारलेली पद्धत सर्वात योग्य वाटली असल्याचे समजते. मुकेश यांची एकूण संपत्ती २०८ अब्ज डॉलर्स असून त्यांना दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. २००२ मध्ये रिलायंसचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांचे निधन झाल्यावर त्यांची मुले मुकेश आणि अनिल यांच्यात वाद निर्माण झाला होता. अनेक वर्षे हा वाद सुरु राहिला व अखेरी त्यांच्या मातोश्री कोकिलाबेन यांनी दोघांच्या वाटण्या केल्या. त्याला स्टेकहोल्डर्स कडून विरोध झाला पण अखेरी उच्च न्यायालयाने या वाटपावर शिक्कामोर्तब केले होते.

१९९२ मध्ये वॉलमार्ट इंक कंपनीचे संस्थापक सॅम यांचा मृत्यू झाला. त्यापूर्वी त्यांनी व्यवसायाच्या वाटण्या होऊ नयेत यासाठी अगोदरच योजना केली होती. वॉल्टन यांनी त्यांच्या मृत्युपूर्वी ४० वर्षे अगोदर म्हणजे १९५३ मध्येच उत्तराधिकारी कोण असावा या योजनेवर काम सुरु केले होते. त्यानुसार १९८८ मध्ये कंपनीचा रोजचा हिशोब व्यवस्थापकाच्या हाती दिला गेला आणि त्यावर नजर ठेवण्यासाठी एक बोर्ड स्थापन करण्यात आले. वॉल्टन यांनी त्यांच्या संपत्तीचा ८० टक्के हिस्सा चार मुलांना दिला होता.

मिळालेल्या माहितीनुसार मुकेश अंबानी त्यांची संपत्ती एका ट्रस्ट कडे ट्रान्स्फर करण्याचा विचार करत आहेत. या ट्रस्टचे मालकी हक्क रिलायंस इंडस्ट्री कडे असतील. त्यात मुकेश, पत्नी नीता, मुले आकाश, अनंत आणि मुलगी इशा यांचा स्टेक असेल. मुकेश यांच्या विश्वासातील काही खास लोकांना ट्रस्टचे सल्लागार नेमले जाईल असे समजते. याचाच अर्थ वॉल्टन यांच्या तत्वानुसार मुकेश संपत्ती वाटपाचा विचार करतील असे म्हटले जात आहे.