भारतात बनणार घातक आणि अचूक वेध घेणाऱ्या एके २०३ रायफल्स

पुढच्या महिन्यात रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन भारत भेटीवर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाच्या ५ हजार कोटी खर्चाच्या एका कराराला रक्षा मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. या करारानुसार रशियाच्या सहकार्याने उत्तरप्रदेशातील अमेठी येथे एके २०३ या अत्यंत घातक आणि अचूक निशाणा साधणाऱ्या असाल्ट रायफलचे उत्पादन केले जाणार आहे. पुतीन भेटीत या करारावर हस्ताक्षर होण्याची शक्यता आहे.

भारत आणि रशिया मधील या करारावर काही वर्षापूर्वी सहमती झाली होती पण त्यात तंत्रज्ञान हस्तांतरण हा मुख्य मुद्दा होता. भारतीय सेनेसाठी ७.५ लाख असाल्ट रायफल्सची गरज आहे. अमेठी येथील प्रस्तावित उत्पादन प्रकल्पात या ७.५ लाख एके २०३ रायफल्स मध्ये सुरवातीच्या ७० हजार रायफल्स मध्ये रशियात बनलेली उपकरणे वापरली जाणार आहेत आणि नंतरच्या सर्व रायफल्स अमेठी मध्येच बनणार आहेत असे समजते. उत्पादन सुरु झाल्यावर सेनेला या रायफल्स मिळण्यासाठी अडीच वर्षे लागतील असेही समजते.

२०१९ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी इंडो रुस ऑर्डनन्स फॅक्टरीचे उद्घाटन केले असून येथेच एके २०३ रायफल्सचे उत्पादन होणार आहे. जगप्रसिद्ध एके ४७ चे हे अपग्रेडेड व्हर्जन आहे. या रायफल्स एके सिरीज मधील सर्वात आधुनिक आणि घातक आहेतच पण त्या वजनाला हलक्या, छोट्या आणि शत्रूचा अचूक वेध घेतील अश्या आहेत. या रायफलचे वजन ३.८ किलो आणि लांबी ७०५ मिमी आहे. शिवाय त्या सेमी आणि फुल ऑटोमॅटिक अश्या दोन्ही पद्धतीने वापरता येतात. एके सिरीज मधील एके ४७ हि बेसिक रायफल असून त्यानंतर एके ७४, ५६, १०० आणि २०० अश्या सिरीज आल्या आहेत.

एके २०३ या रायफलची रेंज ८०० मीटरची आहे. त्यामुळे दुरूनच शत्रूचा अचूक वेध घेता येतो. या रायफल मधून एका मिनिटात ६०० बुलेट फायर केल्या जातात.