करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कमी- डॉ. गुलेरिया
दिवाळी नंतर देशात पुन्हा करोनाचा उद्रेक होऊन तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात होती मात्र दिल्लीच्या एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कमी असल्याचे आणि तिसरी लाट आलीच तरी पहिल्या दोन लाटेइतकी ती तीव्र नसेल असे सांगितले आहे. आयसीएमआर प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन गुलेरिया यांच्या हस्ते झाले तेव्हा ते बोलत होते.
डॉ. गुलेरिया म्हणाले, दिवाळी उलटून गेल्यावरही देशात करोना संक्रमणाचा वेग वाढलेला नाही. त्याचा अर्थ लसीकरण या विषाणूपासून सुरक्षा देण्यास उपयोगी ठरले आहे. सध्या तरी बुस्टर किंवा अतिरिक्त तिसरा डोस देण्याची गरज नाही. लसीकरण वेगाने होत आहे आणि त्यामुळे संक्रमण गंभीर पातळीवर गेलेले नाही तसेच ज्यांना करोना लागण होतेय त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्याची वेळ कमी वेळा येते आहे असे दिसून येत आहे. परिणामी यापुढे करोनाची मोठी आणि तीव्र लाट येण्याची शक्यता दिवसेदिवस कमी होते आहे.
देशात करोनाची पहिली आणि दुसरी लाट तीव्र होती. करोना पूर्ण जाणार नाही मात्र यापुढे तो स्थानिक आजार स्वरुपात असेल असे सांगून गुलेरिया म्हणाले, करोना केसेस आढळतील पण करोनाचा प्रकोप होण्याची शक्यता कमी आहे. केसेस मध्ये वेगाने वाढ होत नाही त्यामुळे बुस्टर सध्यातरी आवश्यक नाही.
युरोप आणि अमेरिकेत काही देशात चौथी तर काही देशात पाचवी लाट आली आहे. न्यूझीलंड, फ्रांस, रशिया देशात परिस्थिती गंभीर आहे तर अमेरिकेत दररोज करोना बाधितांच्या संखेत वाढ होत असून दररोज सरासरी ९२ हजार नवीन केसेस येत आहेत असेही समजते.