एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यावर सीएएच्या मुद्द्यावरून योगी आदित्यनाथ यांची टीका!


लखनौ – जसजशा उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत, तसतसे तेथील राजकीय वातावरण तापू लागले आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडताना राजकीय पक्ष दिसत नाहीत. कानपूरमध्ये बोलताना एमआयएम आणि पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निशाणा साधला आहे. तसेच, समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळावर देखील त्यांनी तोंडसुख घेतले आहे.

यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी असदुद्दीन ओवैसी यांना समाजवादी पक्षाचे एजंट म्हणत त्यांच्यावर टीकेची तोफ डागली. आज या चाचाजान आणि अब्बाजानच्या अनुयायांना मी निक्षून सांगतो, की त्यांनी लक्षपूर्वक हे ऐकून घ्यावे. जर उत्तर प्रदेशमध्ये लोकांच्या भावना भडकवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला, तर अशा वेळी सक्तीने गोष्टी कशा हाताळायच्या, ते उत्तर प्रदेशमधील सरकारला चांगलेच ठाऊक असल्याचे आदित्यनाथ म्हणाले. असदुद्दीन औवैसी सीएएच्या मुद्द्यावरून लोकांच्या भावना भडकवत असून ते सपाचे एजंट असल्याचे यावेळी आदित्यनाथ म्हणाले.

यावेळी योगी आदित्यनाथ यांनी आपल्या सरकारचे कौतुक करत आता उत्तर प्रदेशमध्ये दंगली होत नाही. दंगलमुक्त उत्तर प्रदेश अशी राज्याची ओळख आहे. राज्यात आता दंगली आणि माफियांचे सरकार नसून माफियांवर बुलडोझर चालवणारे सरकार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील दंगलींवरून योगी आदित्यनाथ यांनी आधीच्या सरकारवर टीका केली. उत्तर प्रदेशमध्ये २०१७पूर्वी दर तिसऱ्या-चौथ्या दिवशी दंगल व्हायची. पण आज सीएएच्या नावावर लोकांच्या भावना भडकवणाऱ्यांना मी इशारा देतो, असे ते म्हणाले.