माझ्याकडे मलिक आणि दाऊदचा फोटो असल्याचे सांगणाऱ्याला क्रांती रेडकरने रिप्लाय केल्याचा ‘तो’ स्क्रिनशॉट निघाला खोटा


मुंबई – मागील अनेक आठवड्यांपासून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे आरोप करत आहेत. मलिक यांनी अभिनेता शाहरुख खानचा पुत्र आर्यन खानला क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणामध्ये अटक झाल्यानंतर समीर वानखेडेंनी ते मुस्लीम असल्याचं लपवून आरक्षणाचा लाभ घेत नोकरी मिळवल्याचा आरोप केला. त्यानंतर वेळोवेळी कधी ट्विटरवरुन तर कधी थेट पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मलिक यांनी समीर वानखेडेंवर आरोप केले.

त्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर समीर यांच्या बाजूने त्यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने बाजू मांडण्यास सुरुवात केली. आधी मलिक यांचे नाव घेणे क्रांती टाळत होती, पण ती आता थेट नाव घेऊन टीका करु लागली आहे. नुकताच मलिक आणि वानखेडे वादामधून क्रांती आणि मलिक यांच्या कन्येमध्येही ट्विटरवर वाद झाला. असे असतानाच आता नवाब मलिक यांनी क्रांती रेडकरच्या चॅटचा एक स्क्रीनशॉर्ट शेअर करत तिच्यावर निशाणा साधला आहे. पण या स्क्रीनशॉर्टबद्दल क्रांतीने काही तासांनी खुलासा केला असून हा सर्व प्रकार कोणत्या थराला चालला आहे, अशा शब्दांमध्ये तिने संताप व्यक केला आहे.

वानखेडे कुटुंबिय मागील काही आठवड्यांपासून वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेऊन आपली बाजू मांडत आहेत. दरम्यानच्या काळात दाऊदशी संबंधित संपत्ती नवाब मलिक यांनी घेतल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर मलिक यांनी आपला याच्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. याच वादाच्या पार्श्वभूमीवर एका युझरने क्रांतीला मलिक आणि दाऊद कनेक्शनसंदर्भात माहिती असल्याचे सांगितले. त्याच संदर्भातील हे चॅट आहे.

मलिक यांनी शेअर केलेला संवाद हा ट्विटरवरील असून यामध्ये क्रांती रेडकरला एका युजरने माझ्याकडे नवाब मलिक यांचे काही फोटो असल्याचे सांगितले आहे. क्रांती रेडकर मॅडम नवाब मलिक आणि दाऊद यांचा संबंध असल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, अधिक माहितीसाठी थेट मेसेज करा, असे या युझरने म्हटले आहे. त्यावर रात्री पावणे अकराच्या सुमारास क्रांती रेडकरने, तुमच्याकडे काय पुरावे आहेत?, असा रिप्लाय केला आहे. नवाब मलिक आणि दाऊद यांचा फोटो माझ्याकडे असल्याचे या युझरने म्हटले. त्यावर क्रांतीने पुढच्या मिनिटालाच, कृपया तो फोटो पाठवा. याबदल्यात तुला योग्य तो मोबदला मिळेल, असा रिप्लाय केला. मलिक यांनीया संवादाचा स्क्रीनशॉर्ट अरे देवा… अशा कॅप्शनसहीत शेअर केला.


पण या ट्विटनंतर क्रांतीने काही तासांनी ट्विट करत हा सारा प्रकार म्हणजे बनाव असल्याचे म्हणत संताप व्यक्त केला. जो फोटो नवाब मलिक यांनी शेअर केला आहे, तो एका सटायर म्हणजेच उपहासात्मक मिम्स आणि फोटो तयार करणाऱ्या अकाऊंटवरील असून तो एडीटेड कंटेट असल्याचे या अकाऊंटची मालकी असणाऱ्या व्यक्तीनेच म्हटले आहे. क्रांतीने हे स्क्रीनशॉर्ट शेअर करत, हा प्रकार एवढ्या खालच्या थराला जाईल असे वाटले नसल्याचे म्हटले आहे.