निवडणूक लढवणार ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू


नवी दिल्ली – १७ डिसेंबर रोजी स्पेनमध्ये होणाऱ्या जागतिक चॅम्पियनशिप दरम्यान बीडब्ल्यूएफ अ‍ॅथलीट आयोगामार्फत घेण्यात येणारी निवडणूक दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू लढवणार आहे.

सध्या बालीमध्ये ‘सुपर १०००’ श्रेणीच्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत विश्वविजेती सिंधू खेळत आहे. ‘सुपर ७५०’ श्रेणीच्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडिमटन स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत सिंधू आणि श्रीकांत यांनी मजल मारली होती. शनिवारी या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर या दोघांनीही ‘सुपर १०००’ श्रेणीच्या इंडोनेशिया खुल्या स्पर्धेतील जेतेपदासाठी तयारी सुरू केली. बीडब्ल्यूएफ अ‍ॅथलीट आयोगाच्या निवडणुकीतील सहा पदांसाठी नामांकन भरणाऱ्या नऊ खेळाडूंपैकी सिंधू एक आहे.

बॅडमिंटन खेळासंदर्भातील आघाडीची संस्था असणाऱ्या बीडब्ल्यूएफ अ‍ॅथलीट आयोगाने एका पत्रकामध्ये, अ‍ॅथलीट आयोग (२०२१ पासून २०२५ कालावधीसाठी) निवडणुका १७ डिसेंबर २०२१ रोजी संपूर्ण ताकदीने बिडब्ल्यूएफ विश्व चॅम्पियशनशिपसोबत स्पेनमध्ये होणार आहे. दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणारी सिंधू सध्या पुन्हा निवडणुकीला उभी राहणारी एकमेव खेळाडू आहे. यापूर्वी तिने २०१७ मध्ये ही निवडणूक लढली होती. सध्याच्या कार्यकाळामध्ये सिंधू ही सहा महिला प्रतिनिधींपैकी एक होती, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

२६ वर्षीय सिंधूबरोबरच इंडोनेशियाची महिला खेळाडू ग्रेसिया पोली सुद्धा निवडणूक लढणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिने सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. आईओसीने बिलिव्ह इन स्पोर्ट्स या मोहिमेसाठीही मे महिन्यामध्ये सिंधूची अ‍ॅथलीट आयोगाने निवड केली होती.