आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाबाबत समोर आली नवी माहिती


‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा ओळखला जातो. आमिर खान हा गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांसह त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. लवकरच आमिर खान तिसरे लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत आमिर हा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु आहेत. हे दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. पण आमिर खानच्या एका जवळच्या व्यक्तीने नुकतेच यावर स्पष्टीकरण दिले आहे.

१९८७ मध्ये रिना दत्ताशी आमिर खानने लग्न केले होते. त्यानंतर २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आमिरने किरण रावसोबत दुसरे लग्न केले. पण त्या दोघांचा काही दिवसांपूर्वी घटस्फोट झाला. घटस्फोटाच्या अवघ्या काही महिन्यानंतर आता आमिर लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. आमिर येत्या काही दिवसात तिसरे लग्न करणार असल्याच्या चर्चा समोर येत आहे.

विशेष म्हणजे तो अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. फातिमाने आमिरसोबत ‘दंगल’ आणि ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटात काम केले आहे. किरण रावसोबत घटस्फोट घेतल्यानंतर आमिर हा फातिमासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यावरुन आमिरला अनेकांनी ट्रोल केले होते.

पण या संपूर्ण प्रकरणावर आता आमिरने स्पष्टीकरण दिले आहे. आमिरच्या जवळच्या सूत्राने ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, आमिर खान तिसरे लग्न करणार असल्याची बातमी पूर्णत: चुकीची आणि खोटी आहे. आमिर तिसरे लग्न करण्याच्या कोणत्याही विचारात नसल्यामुळे मीडियामध्ये त्यांच्याबद्दल ज्या काही बातम्या येत आहेत, त्या पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

२०२२ च्या फेब्रुवारी महिन्यात आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा आगामी चित्रपट रिलीज होणार आहे. ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये आमिर आणि करीना कपूर खान पुन्हा एकदा दिसणार आहेत. त्या दोघांनी या आधी ‘३ इडियट्स’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. आमिर खान, करीना कपूर खान, नागा चैतन्य, मोना सिंग आणि मानव व्हीजे या चित्रपटात दिसणार आहेत.