बीसीसीआयच्या हलाल मांस अनिवार्य निर्णयावरुन नेटिझन्सचा टिकेचा भडीमार


नवी दिल्ली – सध्या टीम इंडियाच्या नव्या डाएट प्लॅनवरून गदारोळ सुरू आहे. फक्त हलाला प्रमाणित मांस खाणे भारतीय संघाच्या क्रिकेटपटूंना बंधनकारक केल्याबद्दल सोशल मीडियावरुन बीसीसीआयवर टीका होत आहे. ट्विटरवर #BCCI_Promotes_Halal या नावाने एक ट्रेंड सुरू आहे, भारतीय क्रिकेट बोर्डावर ज्यामध्ये ताशेरे ओढले जात आहेत. बीसीसीआयने दोन दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन आहार योजना तयार केल्याची माहिती समोर आली होती. या योजनेचे क्रिकेटपटूंना काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. यामध्ये हलाल मांस खाण्यास सांगितले आहे.

स्पोर्ट्स तकने दिलेल्या वृत्तानुसार, कोणत्याही प्रकारे डुकराचे मांस आणि गोमांस खाण्याची खेळाडूंना परवानगी नाही. खेळाडूंची फिटनेस आणि तब्येत लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे. कोणाला जर मांस खायचे असेल तर ते फक्त हलाल प्रमाणित मांस खाऊ शकतात. याशिवाय तुम्ही इतर कोणतेही मांस खाऊ शकत नाही. येणाऱ्या वर्षात होणार्‍या मोठ्या मालिका आणि आयसीसी इव्हेंटमध्ये खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी हा डायट प्लॅन खेळाडूंवर काटेकोरपणे लागू करण्यात येणार आहे. खेळाडूंचे वजन वाढणार नाही याचीही काळजी घेतली जाईल.