मुंबई पोलिसांकडून करण्यात येणार आर्यन खान प्रकरणाची चौकशी


मुंबई – एनसीबीवर मुंबई ड्रग्ज प्रकरणी प्रश्नचिन्ह उभे राहू लागले होते. एनसीबीने बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानसह इतरांना अटक केली होती. आता एनसीबी या प्रकरणी आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांकडून करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

आर्यन खान आणि इतर काही आरोपींना मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. कोणतेही ड्रग्ज आर्यन खानकडे सापडले नाहीत, तसेच या प्रकरणात ज्या व्हॉट्सअप चॅटचा पुरावा म्हणून एनसीबीकडून आधार घेण्यात आले होते, त्यावर आक्षेप घेण्यासारखे काहीही नसल्याचे 28 ऑक्टोबरला दिलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या प्रतीमध्ये म्हटले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी क्रूझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उभे केले. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात झालेल्या कारवाईत भाजपशी संबंधित लोक असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर या प्रकरणातील एक पंच किरण गोसावी याच्यावरही गुन्हे दाखल असून तो फरार असल्याचे समोर आले होते. नवाब मलिक यांच्याकडून आरोप सुरू असताना दुसरीकडे या प्रकरणाशी निगडित असलेल्या काही जणांकडूनही गौप्यस्फोट करण्यात येत होते. आर्यन खानवर झालेली कारवाई ही खंडणीसाठी झाल्याचाही आरोप होऊ लागला होता.