मंत्रालय बंद रहात आहेत, पण दुकानदारी जोरात सुरू आहे, पंकजा मुंडेंचा ठाकरे सरकारला टोला!


मुंबई – आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. वीजबिल वसुली बंद करा म्हटले, तर वीज बंद केली. वैधानिक विकास महामंडळे बंद केली आहेत. आमच्या सरकारने सुरू केलेल्या योजना बंद केल्या. या सरकारमध्ये सर्व योजना बंद होत आहेत, पण भ्रष्टाचार जोरात सुरू आहे. मंत्रालय बंद राहात आहेत, पण दुकानदारी जोरात सुरू असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. पंकजा मुंडेंनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यासोबतच इतरही अनेक मुद्द्यांवरून निशाणा साधला आहे.

एखाद्या मंत्रालयात मुख्यमंत्रीपद, त्याखालोखाल गृहमंत्रीपद महत्त्वाचे आहे. पण राज्यातील मंत्री स्वत:च भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले असतील, तर जनतेने कुणाकडे बघायचे. कुणाकडून अपेक्षा ठेवायची. लोकांना आता या सरकारकडून अपेक्षा राहिल्या नाहीत. येणाऱ्या निवडणुकीत लोक सरकारला इंगा दाखवल्याशिवाय राहणार नसल्याचे त्या म्हणाल्या.

सध्या राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा मुद्दा गाजत आहे. पंकजा मुंडे यांनी या मुद्द्यावरून देखील राज्य सरकारला सुनावले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळलेला आहे. एखाद्या संघटनेच्या सगळ्या मागण्या मान्य करता येत नाहीत. पण त्यांच्याशी चर्चा करणे गरजेचे आहे. सरकारने चर्चेसाठी विलंब केल्यामुळे हा संप चिघळला, असे त्या म्हणाल्या.