सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने उडवला विजयी गुलाल; भाजपचा दारुण पराभव


सांगली – महाविकास आघाडीने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाजपचा दारुण पराभव केला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी २१ जागांपैकी १७ जागांवर दणदणीत विजय मिळवत वर्चस्व मिळवले आहे. अवघ्या चार जागा भाजपला मिळाल्या आहेत. पण या निवडणुकीमध्ये काँग्रेस आमदाराला पराभव स्वीकारावा लागला आहे.

२१ नोव्हेंबर रोजी अत्यंत चुरशीने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या निवडणुकीसाठी मतदान झाले होते. ८५ टक्के मतदान या निवडणुकीमध्ये झाले. महाविकास आघाडीने याच निवडणुकीमध्ये भाजपचा दणदणीत पराभव केला आहे. २१ जागांपैकी १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १४ जागांवर विजय मिळवला आहे. आधीच तीन जागा महाविकास आघाडीने बिनविरोध जिंकल्या आहेत. या निवडणुकीमध्ये राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपला केवळ चार जागा मिळाल्या आहेत.

लक्षवेधी ठरलेल्या लढतीमध्ये भाजपचे राहुल महाडिक, संग्रमसिंह देशमुख, सत्यजित देशमुख आणि प्रकाश जमदाडे हे विजयी झाले आहेत. काँग्रेसचे आमदार व सांगली जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्षांना धक्कादायक पराभव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि ऐनवेळी निवडणुकीत भाजपच्या उमेदवार घेणारे प्रकाश जमदाडे यांनी विक्रम सावंत यांचा पराभव केला आहे. आमदार विक्रम सावंत हे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे मामा आहेत. त्यामुळे काँग्रेसचा या ठिकाणी ‘योग्य कार्यक्रम’ करण्यात आल्याची जोरदार चर्चा स्थानिक स्तरावर सुरू आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गुलाल उधळून, ढोल-ताशांवर नाचून या विजयाचा आनंद साजरा केल्याचे चित्र पहायला मिळाले.