साताऱ्यात शशिकांत शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी फोडले राष्ट्रवादीचेच कार्यालय


सातारा : साताऱ्यात जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालानंतर मोठी राडेबाजी पाहायला मिळत आहे. अवघ्या 1 मताने राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. शशिकांत शिंदे यांचा राष्ट्रवादीचे बंडखोर नेते ज्ञानदेव रांजणे यांनी पराभव केला. या पराभवानंतर शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यालयावर दगडफेक केली.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ज्ञानदेव रांजणे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत दगडफेक केली. राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा, पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा फोटो ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यालयावरही आहे. याच कार्यालयावर शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. या दगडफेकीनंतर साताऱ्यात तणाव पाहायला मिळत आहे.

दरम्यान शशिकांत शिंदे यांनी मी माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन करेन, मला ज्या नेत्यांनी राजकीय क्षेत्रात उभे केले, त्या पक्षाविरोधात चुकीची भूमिका घेऊ नका, ही भूमिका योग्य नाही, मी जाहीर माफी मागतो, पवारसाहेब, अजितदादा, सुप्रिया ताई यांची माफी मागतो, कार्यकर्त्यांनी भावनेच्या भरात काही केले असेल, तर दिलगिरी व्यक्त करतो. मी पक्षाचा सच्चा कार्यकर्त्या असून हे पवार साहेबांना माहिती आहे, एकनिष्ठ आहे, त्यांच्यासाठी मी जीव देईन, फक्त माझी एकच भूमिका असेल कार्यकर्त्यांनी अशी भूमिका घेऊ नये. एका मताने मी पराभूत झालो, तो पराभव स्वीकारतो, पवारसाहेब, अजितदादा यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले. माझ्या पराभवामागे फार मोठे कारस्थान होते, येत्या काळात ते समोर येईल, माझा गाफीलपणा मला नडल्यामुळे माझा पराभव झाल्याचे शशिकांत शिंदे म्हणाले.