इम्रान खान यांची भारताला पाकिस्तान मार्गे अफगाणिस्तानला गहू पाठवण्यास परवानगी


लाहोर – सोमवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जाहीर केले की भारताला त्यांचे सरकार ५०,००० मेट्रिक टन गहू शेजारच्या अफगाणिस्तानला त्यांच्या हद्दीतून पाठवण्याची परवानगी देईल. इम्रान खान यांनी इस्लामाबादमध्ये नव्याने स्थापन झालेल्या अफगाणिस्तान आंतर-मंत्रालय समन्वय कक्षाच्या (AICC) पहिल्या सर्वोच्च समितीच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. त्यांनी यावेळी आंतरराष्ट्रीय समुदायाला मानवतावादी संकट टाळण्यासाठी अफगाणिस्तानला पाठिंबा देण्याच्या सामूहिक जबाबदारीची आठवणही करून दिली.

खान यांनी बैठकीदरम्यान, पाकिस्तानच्या निर्णयाची घोषणा केली की भारताने अफगाणिस्तानला मानवतावादी सहाय्य म्हणून ५०,००० मेट्रिक टन गहू देण्याची ऑफर दिली आहे, भारताच्या बाजूने जी कार्यपद्धती निश्चित होताच पाकिस्तानमधून जाईल, असे वृत्त पाकिस्तानी सरकारी रेडिओने दिले.

सध्या, फक्त अफगाणिस्तानला भारतात माल निर्यात करण्यास पाकिस्तान परवानगी देत आहे. पण सीमा ओलांडून इतर कोणत्याही दुतर्फा व्यापारास परवानगी देणार नाही. भारताने गेल्या महिन्यात, अफगाणिस्तानसाठी मानवतावादी मदत म्हणून ५०,००० मेट्रिक टन गहू देण्याचे जाहीर केले होते आणि पाकिस्तानला वाघा सीमेवरून अन्नधान्य पाठवण्याची विनंती केली.

पंतप्रधान खान यांना अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनीही पाकिस्तानमार्गे गहू वाहतूक करण्यास परवानगी देण्याची विनंती केली होती आणि असे सुचवले होते की तालिबान सरकार भारताकडून मानवतावादी मदत स्वीकारण्यास तयार आहे. अफगाण लोकांच्या मानवतावादी गरजांमध्ये भारताने योगदान दिले आहे. यामध्ये गेल्या दशकभरात अफगाणिस्तानला १ दशलक्ष मेट्रिक टन पेक्षा जास्त गहू पुरवणे समाविष्ट आहे.

भारताने गेल्या वर्षी देखील अफगाणिस्तानला ७५,००० मेट्रिक टन गव्हाची मदत केली होती, असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सप्टेंबरमध्ये अफगाणिस्तानमधील मानवतावादी परिस्थितीवर संयुक्त राष्ट्रांच्या उच्चस्तरीय बैठकीत सांगितले होते. पण काश्मीरच्या मुद्द्यावरून नवी दिल्ली आणि इस्लामाबादमधील संबंधांमध्ये तणाव असताना पाकिस्तानने अफगाण लोकांना गहू देण्याच्या भारताच्या प्रयत्नांना रोखले होते.