कंगना राणावतनंतर आता काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य


नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी भारताच्या स्वातंत्र्याबद्दल अभिनेत्री कंगना राणावतने वादग्रस्त वक्तव्य केले होते. १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य भीक असून २०१४ मध्ये देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले, अशा आशयाचे ते वक्तव्य होते. त्याचे पडसाद अद्यापही उमटत असताना आता काँग्रेस नेत्यानेही असेच वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या काँग्रेस नेत्याने २०१४ पासून भारत अमेरिकेचा गुलाम झाला आहे, असा उल्लेख केले आहे.

हे वक्तव्य काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केले आहे. अय्यर इंडो-रशिया फ्रेंडशिप सोसायटीच्या एका कार्यक्रमात म्हणाले की, आपण २०१४ पासून अमेरिकेचे गुलाम झालो आहोत. अय्यर यांनी आपल्या भाषणात भारत रशिया संबंधांचा उल्लेख करत आपले विधान सिद्ध करण्याचाही प्रयत्न केला.

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर म्हणाले की, आपण गेल्या 7 वर्षात पाहत आहोत की, कोणतीही पक्षांतराची चर्चा होत नाही. शांततेची चर्चा नाही. अमेरिकन लोकांचे ते गुलाम बनून बसले आहेत आणि ते म्हणतात चीनपासून वाचले पाहिजे. भारत-रशियाचे संबंध वर्षानुवर्षे जुने आहेत, पण मोदी सरकार आल्यापासून हे नाते कमकुवत झाले असल्याचे अय्यर सांगत होते. मणिशंकर अय्यर म्हणाले की, २०१४ पर्यंत रशियाशी आमचे जे संबंध होते, ते खूपच कमी झाले आहेत.

मणिशंकर अय्यर यांनी यापूर्वी मध्ययुगीन इतिहासाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते, देशावर ५० वर्षे अकबरने राज्य केले. हे लक्षात घेऊन मी राहत असलेल्या रस्त्याचे नाव अकबर रोड असे ठेवले. आमची हरकत नव्हती. महाराणा प्रताप रस्ता बनवा, असे आम्ही कधीच म्हटले नाही, कारण आम्ही अकबराला आपलाच मानतो आणि त्याला परके मानत नाही.