या देशातील नागरिक आहेत सर्वात कमी उंचीचे
जगात अनेक देश आहेत आणि प्रत्येक देशातील लोकांची काही खासियत आहे. काही देशातील लोक अधिक उंच आहेत तर काही देशातील सर्वसामान्य उंचीचे तर काही बुटके सदरात मोडणारे आहेत. जगात सरासरी उंचीत कमी उंचीच्या लोकांचा देश आहे दक्षिण पूर्व आशियातील पूर्व तिमूर. यालाच तिमूर लेस्टे असे म्हटले जाते. या देशात नागरिकांची उंची सरासरी पाच फुट इतकीच आहे.
जगातील सर्वात बुटक्या पुरुषाचे रेकॉर्ड गिनीज बुक मध्ये नेपालच्या नावावर आहे तर सर्वात बुटक्या महिलेचे रेकॉर्ड भारताच्या नावावर आहे. पण इस्ट तिमूर मध्ये बुटके लोक एकंदरीत अधिक संखेने आहेत. त्यामुळे याला कमी उंचीच्या लोकांचा देश असेही म्हटले जाते. येथील पुरुषांची सरासरी उंची ५ फुट दोन इंच तर महिलांची सरासरी उंची ५ फुट किंवा त्यापेक्षा कमी आहे. या देशापाठोपाठ कमी उंचीच्या लोकांच्या देशात लाओस देशाचा दुसरा नंबर आहे.
नॅशनल इंस्टीटयूट ऑफ न्यूट्रीशन नुसार भारतातील पुरुषांची सरासरी उंची ५ फुट ८ इंच तर महिलांची उंची ५ फुट ३ इंच आहे. सर्वात उंच लोकांचा देश म्हणून नेदरलंडची ओळख असून येथे सरासरी उंची ६ फुट आहे. अर्थात तिमूर मध्ये १८९६ च्या तुलनेत नागरिक उंचीत थोडी वाढ झाली होती. पण १९७० पासून पुन्हा उंची कमी झाली आहे असे समजते. उंची कमी किंवा अधिक असणे हा जनुकीय परिणाम आहे.