या आहेत जगातील सर्वाधिक अवघड परीक्षा

कोणतीही परीक्षा अवघडच असते. म्हणून तर त्याला परीक्षा म्हटले जाते. आज जगभरात शेकडो प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात. त्यातील काही परीक्षा खरोखर फारच अवघड मानल्या जातात. त्यातील काही तर इतक्या अवघड आहेत कि एखाद्याला त्या देण्यापेक्षा एव्हरेस्ट चढून जाणे सुद्धा सोपे वाटू शकेल. अश्याच काही अवघड परीक्षांची माहिती आमच्या वाचकांसाठी

१)मास्टर सोमेलीयर डिप्लोमा- जगातील हि सर्वाधिक अवघड परीक्षा मानली जाते. आता ही पदवी नाही तर पदविका परीक्षा असूनही अवघड का असा प्रश्न अनेकांना पडेल. त्याचे कारण असे की ही परीक्षा वाईन तज्ञ बनण्यासाठी घेतली जाते. तीन भागात ही परीक्षा होते. त्यात थेअरी, सर्विस आणि ब्लाइंड टेस्टिंग असे तीन प्रकार आहेत. ब्लाईड टेस्टिंग मध्ये विद्यार्थ्यांना जी वाईन टेस्ट साठी दिली जाते ती कुठल्या वर्षात, कुठे बनली हे ओळखावे लागते. या टेस्ट मध्ये बहुतेक विद्यार्थी नापास होतात. गेल्या ४० वर्षात या टेस्ट मध्ये पास झालेल्याची संख्या आहे फक्त दोन हजार.

२)युपीएससी- भारतीय प्रशासकीय सेवेसाठी निवड करताना ही परीक्षा दिली जाते. दरवर्षी ही परीक्षा होते आणि लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. यात सुद्धा तीन राउंड असतात. प्रिलीम, मेन आणि मुलाखत. यात पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी फक्त ०.१ ते ०.४ इतकीच आहे.

३)गौका हि चीनमधील उच्चशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य परीक्षा आहे. यात दोन दिवसात नऊ तास पेपर द्यावे लागतात. त्यातील फक्त ०.२ टक्के विद्यार्थीच टॉप कॉलेज मध्ये प्रवेश मिळविण्यास पात्र ठरतात असे समजते.

४)जेईई अॅडव्हांस- पूर्वी आयआयटी जीईई नावाने ओळख असलेली ही परीक्षा आता जेईई अॅडव्हांस नावाने ओळखली जाते. भारतात आयआयटी इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी ही परीक्षा द्यावी लागते. यात तीन तीन तासाचे दोन ऑब्जेक्टीव्ह पेपर असतात. लाखो विद्यार्थी ही परीक्षा दरवर्षी देतात मात्र त्यातील काही हजार उत्तीर्ण होऊ शकतात.

५)ऑल सोल्स प्राईज फेलोशिप- ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून घेतली जाणारी ही परीक्षा अतिशय अवघड आहे. यात ३ तासाचे चार पेपर द्यावे लागतात. २०१० पर्यत फक्त दोन विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकले आहेत. यात एक शब्द दिला जातो आणि त्यावर मोठा निबंध लिहावा लागतो.