नितीन गडकरी खरेदी करताहेत हायड्रोजन कार

केंद्रीय रस्ते निर्माण आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या व्हर्च्युअल कार्यक्रमात बोलताना सोमवारी एक मोठी घोषणा केली आहे. गडकरी यांनी यावेळी बोलताना ते पुढील महिन्यात हायड्रोजन वर चालणारी कार खरेदी करत असल्याचे सांगितले आहे. त्यांनी केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहनांवर फोकस करतानाचा ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल, बायोएलएनजी या सारख्या अन्य पर्यायाना महत्व देत असल्याचे सांगितले.

गडकरी म्हणाले देशात पारंपारिक इंजिन वाहन नोंदणी बंद होणार नाही. पण इलेक्ट्रिक वाहन धोरण सरकार वेगाने राबवीत आहे आणि देशातील ग्राहकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढली आहे. ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन आहे आणि त्यासाठी सुद्धा सरकार धोरण ठरवीत आहे. गडकरी यांनी ते स्वतः हायड्रोजन कार खरेदी करत आहेत असे यावेळी सांगितले.

ई वाहन विकास केला जात असताना २५० स्टार्टअप या काळात सुरु झाल्याचे सांगून गडकरी म्हणाले, इलेक्ट्रिक वाहने निर्मितीचा खर्च कमी होणार असल्याने ही वाहने सर्वसामान्य लोकांना परवडतील अश्या किमतीत मिळतील. विमानासाठी वापरल्या जाणाऱ्या एटीएफ इंधनात सुद्धा ५० टक्के इथेनॉल वापर करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे असेही त्यांनी सांगितले.