करोनात खासगी विमाने, याच यांच्या खरेदीला जोर
गेल्या दोन वर्षात करोना साथीने जगाला अनेक गोष्टी नव्याने शिकविल्या. त्या संदर्भात अनेक अहवाल येत आहेत. करोना काळात श्रीमंत अतिश्रीमंत झाले, नवश्रीमंतांची संख्या वाढली आणि गरीब अधिक गरिबीत ढकलले गेले याचे रिपोर्ट सुद्धा आले आहेत. करोना काळात उत्पादन आणि वितरण साखळी विस्कळीत झाली, अनेक ठिकाणी ठप्प झाली यामुळे जीवनावश्यक अश्या अनेक वस्तू महाग झाल्या, त्यांची टंचाई निर्माण झाली हेही दिसून आले. मात्र याच यादीत खासगी विमाने, याच, अलिशान महाल, क्रुझ नौका, महागडी घड्याळे यांचीही मागणी प्रचंड वाढली आणि मागणीच्या तुलनेत पुरवठा होऊ न शकल्याने या वस्तूंसाठी प्रतीक्षा यादी करावी लागली आणि या वस्तूंच्या किमती वाढल्या असाही एक रिपोर्ट नुकताच प्रसिद्ध झाला आहे.
अर्थात या वस्तू महाग झाल्याचा विपरीत परिणाम श्रीमंत वर्गावर झाला आहे. खासगी जेट, याच मनासारखी उपलब्ध नाहीत म्हणून या लोकांना प्रतीक्षा यादीला सामोरे जावे लागले आहे. करोना काळात जगभरात आर्थिक दरी फार वेगाने वाढली. वैश्विक धन रिपोर्ट क्रेडीट सुईसे नुसार २०२० मध्ये करोना काळात धनी लोक अधिक वेगाने आणखी श्रीमंत झाले आणि अल्ट्रा रिच श्रेणीत नवीन लोकांची भर पडली. याच काळात अलिशान याच, खासगी विमाने, विलासाच्या वस्तू, सेवा मागणी वेगाने वाढली आणि त्या वस्तू महाग झाल्या.
फोर्च्युनचा रिपोर्ट सांगतो, आंतरराष्ट्रीय विमान सल्ला सेवा कंपनी अर्गस नुसार विमान खरेदी इतिहासात खासगी विमान खरेदीची मागणी या काळात सर्वाधिक होती. अमेरिकेत गेल्या महिन्यात ३,२३,००० खासगी उड्डाणे नोंदविली गेली. खासगी जेट बनविणारी जगातील सर्वात बडी कंपनी नेट जेट्स ला खासगी विमानांचा मागणी नुसार पुरवठा करणे अशक्य झाले त्यामुळे प्रतीक्षा यादी तयार झाली असून आज या यादीत १५०० लोक आहेत. विमानांच्या किमती वाढल्या आहेत आणि किती विमाने विकायची याची सीमा कंपनीने घालून घेतली आहे. त्यामुळे पैसा आहे म्हणून तुम्हाला लगेच विमान खरेदी करता येईल अशी शक्यता नाही.