काल दिवसभरात देशात 8 हजार 488 कोरोनाबाधितांची नोंद, तर 249 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली – : एकीकडे जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभरात वाढत असल्याचे चित्र दिसत असतानाच दुसरीकडे आपल्या देशात सध्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात देशात 8 हजार 488 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर काल दिवसभरात 249 बाधितांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, देशात 538 दिवसांनी देशात सर्वात कमी दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या एक लाख 18 हजार 443 आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल दिवसभरात 12 हजार 510 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. या महामारीमध्ये जीव गमावलेल्यांचा आतापर्यंतचा एकूण आकडा 4 लाख 65 हजार 911 वर पोहोचला आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 3 कोटी 39 लाख 34 हजार 547 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट होताना दिसत आहे. काल दिवसभरात राज्यात 845 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 17 जणांच्या मृत्युची नोंद झाली आहे. त्याचबरोबर 730 बाधितांनी काल कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने महाराष्ट्र वाटचाल करीत असल्याचे या आकड्यातून स्पष्ट होत आहे. सध्या राज्यात एकूण 9 हजार 799 रुग्ण सक्रिय आहेत. राज्यातील नागरिकांसाठी ही अतिशय दिलासादायक माहिती आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यास महाराष्ट्राला मोठे यश आले आहे. या काळात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांसह फ्रंटलाईन वर्कर्सने मोलाचा वाटा उचलला आहे. ज्यामुळे राज्यातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी होऊ लागली. काल दिवसभरात राज्यात 845 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, कोरोनामुळे 17 बाधितांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या राज्यातील मृत्युदर 2.12 टक्के एवढा झाला आहे. तर आर्थिक राजधानी मुंबईत काल दिवसभरात 213 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे, तर 3 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 281 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील कोरोनामुक्तांची एकूण संख्या 7 लाख 39 हजार 707 वर पोहचली आहे.