एनसीबी उचलत असलेल्या पावलांमुळे आर्यन खानच्या अडचणीत होणार वाढ?


मुंबई – जामिनावर बाहेर असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अडचणीत मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) उचलत असलेल्या पावलामुळे वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला मिळालेल्या जामीनाविरोधात एनसीबी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा विचार करत आहे. आर्यन खानच्या जामीनाविरोधात एनसीबी अधिकारी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करायचे की नाही यावर विचार करत असल्याचे एनसीबीतर्फे सांगण्यात आले आहे. एनसीबी सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या जामीन आदेशाची तपासणी करून कायदेशीर मत घेत आहे.

गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर २ ऑक्टोबर रोजी एनसीबीच्या छाप्यादरम्यान ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. आर्यन खानला या प्रकरणी दीर्घ चौकशीनंतर ३ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. पण, २८ ऑक्टोबरला अनेक अटींसह मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. २८ ऑक्टोबर रोजी आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मॉडेल मुनमुन धमेचा यांना न्यायमूर्ती एन डब्ल्यू सांबरे यांच्या एकल खंडपीठाने १ लाख रुपयांच्या जामिनावर जामीन मंजूर केला होता.

मुंबई उच्च न्यायालयाच्या १४ पानांच्या सविस्तर आदेशात, प्रथमदर्शनी आर्यन खान आणि इतर आरोपींविरुद्ध असा कोणताही सकारात्मक पुरावा आढळून आलेला नाही की त्यांनी गुन्हा करण्याचा कट रचला होता, असे म्हटले आहे. आर्यन खानच्या मोबाईलवरून घेतलेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट्समध्ये इतर आरोपींनी गुन्हा करण्याचा कट रचला होता, असे दाखवण्यासाठी काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याचे न्यायालयाने म्हटले.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) एनडीपीएस कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत नोंदवलेले आर्यन खानचे कबुलीजबाब केवळ तपासाच्या उद्देशाने विचारात घेतले जाऊ शकते, असेही आदेशात म्हटले आहे. एनडीपीएस कायद्यांतर्गत आरोपीने कोणताही गुन्हा केला आहे, असा निष्कर्ष काढण्यासाठी हे शस्त्र म्हणून वापरले जाऊ शकत नसल्याचे जामीन आदेशात नमूद करण्यात आले होते.

आर्यन आणि अन्य दोन आरोपींविरोधात केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) जे पुरावे षड्यंत्र रचल्याच्या मुद्द्याबाबत सादर केले, त्यावरून या तिघांविरोधात षड्यंत्र रचल्याचा कुठलाही सकारात्मक पुरावा सकृद्दर्शनी दिसत नाही. कोणतेही अंमली पदार्थ आर्यनकडे सापडलेले नाही, याबाबत दुमत नाही. शिवाय अरबाज आणि धमेचा यांच्याकडे अंमली पदार्थांचा बेकायदा साठा आढळला, तरी त्याचे प्रमाण अत्यल्प होते. अशा वेळी तिन्ही आरोपींनी षड्यंत्र रचल्याचा सकृद्दर्शनी पुरेसा पुरावा आहे का? आणि एनसीबी त्यांच्यावर कट रचल्याचा आरोप ठेवू शकते का, हे तपासणे आवश्यक आहे. त्यासाठी बेकायदा कृत्य केल्याचा पुरावा आहे का हे पाहावे लागते, असे न्यायालयाने या आदेशात म्हटले आहे.