VIRAL VIDEO; या पठ्ठ्याने चक्का पाण्याऐवजी फँटामध्ये बनवली मॅगी, पाहून नेटकरी म्हणाले


मॅगी हा आजकाल बहुतेकांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक बनला आहे. घाईच्या वेळी अनेकांसाठी पोट भरण्याचे २ मिनिटात तयार होणारी ही मॅगी उत्तम साधन आहे. नोकरी करणारे किंवा रात्री उशिरापर्यंत जागणारे लोक भूक लागताच अर्ध्या रात्रीही मॅगी बनवून खातात. पण मॅगीवर गेल्या काही दिवसांत वेगवेगळे प्रयोग करत विचित्र पदार्थ बनवतानाचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. आता व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाण्याऐवजी फँटामध्ये मॅगी शिजवली आहे. नेटकऱ्यांचे डोके हा व्हिडीओ पाहून फिरले आहे. आता सोशल मीडियावर ही फँटा मॅगी प्रचंड चर्चेत आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ओरियोची भजीपासून ते फँटा ऑम्लेटपर्यंत अशा विचित्र पदार्थांचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. या विचित्र पदार्थांच्या यादीत आता फँटा मॅगीने एन्ट्री केलीय. गाजियाबादमधील हा व्हिडीओ असून अमर सिरोही या फूड ब्लॉगरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकतो की, रस्त्याच्या कडेला असलेल्या एका स्टॉलवर विक्रेता फँटामध्ये बनवलेली मॅगी विकतो आहे. फूड ब्लॉगर अमर सिरोही याने या विचित्र मॅगीची चव चाखण्यासाठी या स्टॉलला भेट दिली. त्यावेळी त्याने हा व्हिडीओ त्याच्या यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

सुरूवातीला विक्रेत्याने कढईत तूप टाकून त्यात कांदे, हिरव्या मिरच्या, शिमला मिरची आणि टोमॅटो घालून फोडणी दिली. मग त्याने पॅनमध्ये ‘फँटा’ची पूर्ण बाटली ओतली. त्यानंतर मसाला, हळद, धणे पावडर आणि मीठ घालून उकळत्या फँटामध्ये मॅगी मिसळली. त्यात लिंबाचा रस आणि चाट मसाला टाकला. फूड ब्लॉगर अमर सिरोही सुरुवातीला या विचित्र मॅगी डिशबद्दल थोडा साशंक होता. पण, त्याची प्रतिक्रिया तुम्ही विचार करता तशी नव्हती. त्याला फँटा मॅगी खूप आवडली. अमर सिरोही व्हिडीओमध्ये म्हणाला, मला आश्चर्य वाटते की इतकी चांगली चव कशी आली.

३० रुपये या फँटा मॅगीची किंमत आहे आणि शीतपेयांसाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाते. विक्रेत्याने सांगितले की, तो गेल्या पाच-सहा महिन्यांपासून हा फँटा मॅगी विकत आहे. सोशल मीडियावर फँटा मॅगीचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काही लोकांना हा पदार्थ आवडला आहे, तर काही लोक याला आपत्ती म्हणत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

याबाबत एका यूजरने लिहिले, जगाचा अंत जवळ आला आहे, दुसऱ्या यूजरने लिहिले, मॅगीवरील अत्याचार थांबवा, तर तिसऱ्या यूजरने लिहिले, बस करा आता, नाही पहायची तुझी फँटा मॅगी. हा व्हिडीओ आतापर्यंत ४७ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे, तर १ लाखांहून अधिक लोकांनी तो लाइक केला आहे.