ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांना कोरोनाची लागण


देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचा वेग मंदावला आहे. दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असताना अभिनेते आणि नेते कमल हासन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. काही कारणास्तव कमल हासन हे अमेरिकेला गेले होते. तेथून परत आल्यानंतर त्यांना कोरोनाची काही लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी करताच ती पॉझिटिव्ह आली आहे.

सोशल मीडियावर याबाबत कमल हासन यांनी पोस्ट लिहिली आहे. स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतल्याची त्यांनी माहिती दिली आहे. मी अमेरिकेला जाऊन आल्यानंतर मला कफाचा थोडा त्रास होऊ लागला. मी कोरोना चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे. पण मला जाणवले आहे की कोरोना अजून गेलेला नाही आणि माझी सर्वांना विनंती आहे की काळजी घ्या, या आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.