भाजपला रामराम करुन वरुण गांधी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता


नवी दिल्ली – पक्षनेतृत्वावर नाराज असलेले खासदार वरुण गांधी भाजपला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये वरुण गांधी प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. आजपासून ममता बॅनर्जी दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. ममता बॅनर्जी आणि वरुण गांधी यांची या दौऱ्यांमध्ये भेट होणार असल्याचे म्हटले जात आहे. वरुण गांधी या भेटीमध्ये तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून वरुण गांधी भाजपवर नाराज आहेत. अनेकदा त्यांनी जाहीरपणे भाजपवर टीकाही केली असल्यामुळे त्यांच्या भाजप सोडण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

वरुण गांधी यांनी गेल्या काही दिवसांपासून पक्षावरील आपली जाहीर नाराजी अनेकदा व्यक्त केली. वरुण गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या धोरणावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली. केंद्र सरकारकडून घेतले गेलेले निर्णय तसेच पक्षाच्या धोरणांविरोधात सातत्याने टीका करत असल्यामुळेच वरुण गांधी हे लवकरच भाजपला रामराम करुन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या संपर्कात खासदार वरुण गांधी आहेत. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी या आजपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. वरुण गांधी त्यांची या दौऱ्यादरम्यान भेट घेणार असून, त्यात तृणमूलमधील प्रवेशाबाबतची चर्चा पुढे सरकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या कॅबिनेट विस्तारामध्ये स्थान न मिळाल्यामुळे वरुण गांधी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच वरुण गांधी आणि त्यांची आई मनेका गांधी यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेर काढण्यात आले होते. वरुण गांधी तेव्हापासून पक्षावर नाराज आहेत.

संसदेचे हिवाळी अधिवेशन 29 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. त्यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षांतील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या असून सत्ताधारी भाजपला घेरण्याच्या योजना आखल्या जात आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हिवाळी अधिवेशनापूर्वी तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आल्या आहेत. 22 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ममता बॅनर्जी विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. यामध्ये वरुण गांधी यांचेही नाव असल्याची चर्चा आहे.