केंद्रीय नेतृत्वाने नवीन सरचिटणीसांची यादी जाहीर केल्यानंतर पंकजा मुंडेंनी दिली ही प्रतिक्रिया


बुलढाणा – भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पद किंवा सत्तेसाठी भीक मागणे आपल्या संस्कृतीत नसल्याचे म्हटले आहे. कोणासमोर हात पसरून सत्ता, पद आणि पदासाठी भीक मागणे ही आपली संस्कृती नाही. माझे वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी आम्हाला पद किंवा सत्तेसाठी भीक न मागण्याची शिकवण दिली असल्याचे बुलढाणा येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडेंनी म्हटले आहे.

आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून नुकतीच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. पण, पंकजा मुंडे व विनोद तावडे यांना संधी मिळालेली नाही. दरम्यान, भाजपकडून तावडेंना राष्ट्रीय स्तरावर मोठी जबादारी देत, अखिल भारतीय सरचिटणीस म्हणून नियुक्त केल्यामुळे आता पुन्हा पंकजा मुंडे यांना डावलल्याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत पंकजा मुंडेनी एका कार्यक्रमात प्रतिक्रिया दिली आहे.

एखादे पद मला दिले की नाही याने काही फरक पडत नाही. महत्त्वाचे म्हणजे मला सामाजिक कार्य आणि गरिबांची सेवा करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मी माझ्या वडिलांना हे वचन दिले असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने नवीन सरचिटणीसांची यादी जाहीर केल्यानंतर ही प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिनिधित्व पंकजा मुंडे व विनोद तावडे यांना देखील मिळेल. दोन वर्षानंतर बावनकुळेंना प्रतिनिधित्व मिळाले, त्यांनीही मिळेल. आम्ही सगळेजण संघटनेतील जबाबदारी आणि निवडणुकीची जबाबदारी यामध्ये संघटनेची जबाबदारी जास्त महत्वाची मानतो. त्यामुळे आता अखिल भारतीय सरचिटणीस ही जबाबदारी एवढी मोठी जबाबदारी आहे, की त्यापुढे त्यांचे दोन वर्षांपूर्वी तिकीट कापले हा विषय मागे पडतो तरीही, राजकारणात राहणारा माणूस हा शेवटी निवडणुका लढवण्यासाठी, निवडणुका जिंकण्यासाठी, संविधानिक पदावर जाण्यासाठी इच्छुक असतो. बावनकुळेंचे झाले, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांचे देखील होईल. या वर्षभरात खूप वाव असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.