रझा अकादमीवर बंदी घालण्यासंदर्भातील निर्णय राज्य सरकार, गृहखाते घेईल : संजय राऊत


मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अमरावतीतील वातावरण निवळलेले असताना पुन्हा आगीत तेल ओतू नये, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. राज्य सरकार, गृहखाते रझा अकादमीवर बंदी घालण्यासंदर्भातील निर्णय घेईल, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, कायदेशीर कारवाई करताना गट, तट, पक्ष पाहिला जात नाही. एकेकाळी विरोधी पक्षनेतेही राज्याचे मुख्यमंत्री होते. अमरावतीसारख्या महाराष्ट्रात घटना घडू नयेत, यासाठी विरोधी पक्षनेत्यांनी आगीत तेल न टाकता, ते शांत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. अमरावतीसारख्या घटनांचे राजकारण, पेटवापेटवी ही महाराष्ट्राला परवडणारी नाही. दंगलींसाठी महाराष्ट्र हा ओळखला जाऊ नये. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. आपण पाहिले असेल त्याचे अमरावतीच्या बाजूला पुढे विदर्भात, गडचिरोलीत, याच पोलिसांनी, याच सरकारने 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. कायद्यासमोर सगळे समान आहेत. अमरावतीत दंगल कोणी पेटवली? कोणत्या कारणाने पेटवली? हे देशालाही माहिती आहे, राज्याच्या गृहमंत्र्यांनाही माहीत आहे आणि अमरावतीच्या जनतेलाही माहीत आहे. वातावरण सगळे शांत झाले असताना, उगाचच काड्या करणारे काम कोणीही करु नये, मी त्यांना एवढेच आमच्या पक्षातर्फे आणि महाविकास आघाडीतर्फे आवाहन करेन.

कधी-कधी इंटलिजंस फेल होते. ती शेवटी माणसचे आहेत. देशभरात अनेक घटनांच्या संदर्भात इंटलिजेंस फेल होते. काश्मीरमध्ये होते, त्रिपुरामध्ये होते. तरी देखील दंगल राज्याची, अमरावतीची दंगल नियंत्रणात आणली. अमरावतीत आज शांतता नांदत आहे, हे महत्त्वाचे असल्याचे संजय राऊत म्हणाले. भाजप अजूनही अमरावतीच्या बाबतीत आक्रमक असल्याचे पाहायला मिळते असल्याचे विचारल्यावर, ते आक्रमक आहेत, म्हणजे, त्यांना काय परत दंगल करायची आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. आंदोलन कशाकरीता करत आहेत, काय आहे? महागाई विरोधात आंदोलन करत आहात का? की, चीन लडाखमध्ये घुसल्यामुळे आंदोलन करत आहेत? आंदोलन कशासाठी करत आहेत, त्यांनी सांगावे, असेही संजय राऊत म्हणाले.

भाजपच्या वतीने हिंमत असेल तर रझा अकादमीवर बंदी घाला, असे सांगण्यात येत आहे. संजय राऊत त्याबाबत बोलताना म्हणाले की, बंदी तुम्ही का नाही घातली? असे काही प्रकार तुमच्या काळातही घडले होते. राज्य सरकार कायद्याच्या संदर्भात कुठेही नमते घेत नाही. काय करायचे आहे? ते गृहमंत्री पाहण्यास सक्षम आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजपच्या नेत्यांवर गुन्हे दाखल होणे, म्हणजे, हिंदूंवर गुन्हे दाखल होत असल्याचे म्हणणे चुकीचे आहे. जे दंगलखोर आहेत. ज्यांनी अमरावती पेटवली. ज्यांनी जनतेचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले, ते कुणीही असू देत. ते एकाच पक्षाचे आहेत, म्हणजे, ते हिंदू किंवा मुस्लिम असल्याचे होत नाही.