सानिया मिर्झाच्या ‘त्या’ पोस्टनंतर शोएब मलिकने अर्धवट सोडला बांगलादेश दौरा


ढाका – बांगलादेश दौरा अर्धवट सोडून भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाचा पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक दुबईला परतत आहे. शाहनवाज डहनीला त्याच्या जागी आजच्या सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट सानिया मिर्झाने टाकली होती ज्यामध्ये तिने आपल्या मुलाच्या आजाराबद्दल सांगितले होते.


शोएब मलिक बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या टी -२० मध्ये खेळणार नसल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली आहे. पीसीबीने जारी केलेल्या निवेदनानुसार, शोएब मलिक आपल्या मुलाच्या आजारपणामुळे सोमवारी बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी -२० सामन्याला मुकणार आहे आणि सामन्यापूर्वी तो दुबईला रवाना होईल. रविवारी संध्याकाळी एक इंस्टाग्राम पोस्ट शोएब मलिकची पत्नी सानिया मिर्झाने शेअर केली होती. ज्यामध्ये तिने आपल्या मुलाच्या आजाराबद्दल सांगितले होते. सानियाने या पोस्टमध्ये लिहिले की, जेव्हा तुमचा मुलगा आजारी असतो आणि फक्त दोन तासांच्या झोपेनंतर तुम्ही काम करत असता.

दरम्यान पीसीबीने असेही सांगितले की, या सामन्यानंतर चितगावला कसोटी संघाचे सदस्य रवाना होतील, तर टी -२० आंतरराष्ट्रीय संघाचे सदस्य मंगळवारी दुबईमार्गे पाकिस्तानला परततील. विशेष म्हणजे, टी -२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या पाकिस्तानने या तीन सामन्यांच्या टी -२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात दोन सामने होणार आहेत. या मालिकेतील पहिली कसोटी चितगाव येथे (शुक्रवारपासून) तर दुसरी कसोटी ढाका येथे (४-८ डिसेंबर) खेळली जाईल.