उज्जैनच्या साधूंनी घेतला रेल्वेतील वेटर्सच्या गणवेषावर आक्षेप


नवी दिल्ली – उज्जैनच्या साधूंनी रामायण सर्किट स्पेशल ट्रेनमध्ये सेवा देणाऱ्या वेटर्सच्या गणवेषावर आक्षेप घेतला आहे. या ट्रेनच्या वेटर्सना भगवे कपडे, धोतर, पगडी आणि रुद्राक्षचा हार घालण्यात आला आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये वेटर साधूंच्या वेशात लोकांना जेवण देत आहेत, तेच लोक खरकटी भांडी उचलताना दिसत आहेत.

त्यांचा हा अपमान असल्याचे साधूंचे म्हणणे आहे. इतर कुठल्यातरी रंगाचे कपडे ट्रेन वेटर्सनी घातले पाहिजेत. रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून १२ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या रेल्वेच्या पुढील प्रवासाला विरोध करण्याचा इशारा उज्जैनच्या साधूंनी दिला आहे. संतप्त साधूंनी ट्रेन थांबवण्याचीही भाषा केली आहे. वेटर्सचा पेहराव लवकरात लवकर बदलावा, अन्यथा १२ डिसेंबरला सुटणाऱ्या पुढील ट्रेनसमोर हजारो हिंदूंच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असे आखाडा परिषदेचे माजी सरचिटणीस परमहंस अवधेश पुरी महाराज यांनी म्हटले आहे.

अयोध्या हा दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या या ट्रेनचा पहिला थांबा आहे. येथून धार्मिक यात्रा सुरू होते. अयोध्येतील प्रवाशांना नंदीग्राम, जनकपूर, सीतामढी मार्गे रस्त्याने नेपाळला नेले जाते. यानंतर प्रवाशांना रेल्वेने भगवान शिवाची नगरी काशी येथे नेले जाते. येथून बसने सीता संहिता स्थळ, प्रयाग, शृंगवरपूर आणि चित्रकूटसह काशीच्या प्रसिद्ध मंदिरांमध्ये नेले जाते.