मुंबई पोलिसांकडून जीवाला धोका असल्याने लपून बसले आहेत परमबीर सिंह; वकिलांचा न्यायालयात दावा


मुंबई – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा गंभीर आरोप केलेले आणि सध्या फरार घोषित माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह भारतातच असल्याचे समोर आले आहे. याबाबत न्यायालयाला स्वतः परमबीर सिंह यांच्या वकिलांनी माहिती दिली आहे. आपल्या जीवाला महाराष्ट्र पोलिसांकडून धोका असल्यामुळे परमबीर सिंह समोर येत नाहीत. कोणत्याही सीबीआय किंवा इतर न्यायालयात पुढील ४८ तासात हजर राहण्यास तयार असल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांना परमबीर सिंह यांच्या वकिलाने केलेल्या युक्तिवादानंतर अंतरिम संरक्षण दिले आहे. न्यायालयाने याआधी परमबीर सिंह कुठे आहेत, हे समजल्याशिवाय अंतरिम सुरक्षा देण्यास नकार दिला होता. परमबीर सिंह हे फरार नाही. त्यांना कुठेही पळून जायचे नाही. त्यांच्या जीवाला धोका आहे. महाराष्ट्रात ते आल्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांनी धमकी दिली असल्याचे आरोप वकिलांनी केले आहेत.

दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना मुंबईच्या एस्प्लेनेड न्यायालयाने फरार घोषित करण्याच्या मुंबई पोलिसांच्या अर्जाला परवानगी दिली आहे. परमबीर सिंग व रिजाय भाटी आणि विनय सिंग यांना फरार घोषित करण्यात आले आहे. परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आल्यानंतर त्यांना ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत परमबीर सिंग न्यायायलयासमोर हजर झाले नाही, तर त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळणार आहे.

परमबीर सिंग यांना मुंबईच्या किल्ला कोर्टाने फरार घोषित केले आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने गोरेगावच्या एका प्रकरणात त्यांच्याविरोधात अनेक समन्स काढले होते, पण त्यानंतरही ते पोलिसांसमोर हजर झाले नव्हते. आता न्यायालयाने परमबीर सिंग यांच्यासह रिजाय भाटी आणि विनय सिंग यांना देखील फरार घोषित केले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना गोरेगाव खंडणी प्रकरणात गुन्हेगार घोषित करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मुंबईच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालयात विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी अर्ज दाखल करून सिंग व्यतिरिक्त रियाझ भाटी आणि विनय सिंग उर्फ बबलू या इतर दोन आरोपींना गुन्हेगार घोषित करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती.

९ लाख रुपयांच्या खंडणीचा आरोप करत गोरेगावमधील बिमल अग्रवाल या बिल्डरने गुन्हा दाखल केला होता. तसेच सचिन वाझेला आत्तापर्यंत एकूण ११ लाख ९२ हजारांचा हप्ता दिल्याचेही, त्यांनी तक्रारीत म्हटले होते. परमबीर सिंह यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह ऊर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह ऊर्फ बबलू आणि रियाज भाटी यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणात १२ ऑक्टोबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सिंह यांना नोटीस बजावण्यात आली होती. तक्रारीनुसार, जानेवारी २०२० ते मार्च २०२१ पर्यंत ९ लाख वसुलीचा आरोप तक्रारदाराने केला आहे.