मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन​प्रकल्प सर्वेक्षणाचे काम पूर्ण, आता प्रतिक्षा अहवाल अन् मंजुरीची


मुंबई – महाराष्ट्रातील जनतेला लवकरच राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूरदरम्यानचा प्रवास अवघ्या चार तासांमध्ये करणे शक्य होणार आहे. कारण राज्यातील ही दोन्ही महत्वाची शहरे हायस्पीड रेल्वे कनेक्टीव्हीटीच्या माध्यमातून जोडण्यासंदर्भातील सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डिलेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून तयार केला जात आहे. मुंबई ते नागपूरदरम्यान ७६६ किलोमीटर लांबीचा बुलेट ट्रेन प्रकल्प राबवण्यासंदर्भातील चाचणी या अहवालामध्ये सुरु आहे.

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसंदर्भातील सविस्तर अहवाल पुढील वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारला सूपूर्द केला जाण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासंदर्भातील हवाई सर्वेक्षण, समाजिक परिणामांसंदर्भातील सर्वेक्षण, नैसर्गिक गोष्टींवर होणाऱ्या परिणामासंदर्भातील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आता सविस्तर अहवाल बनवण्याचे काम सुरु असल्याची माहिती या प्रकल्पाशीसंबंधित अधिकाऱ्यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली आहे.

महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांमधून मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प जाणार आहे. जमीन अधिग्रहण काही जिल्ह्यांमध्ये करावे लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या जेवढा वेळ दोन शहरांमधील प्रवास करण्यासाठी लागतो, तो अर्ध्याहून अधिक कमी करण्याचा विचार आहे. रस्ते मार्गाने सध्या या दोन्ही शहरांमधील प्रवास करण्यासाठी किमान १२ तास लागतात. हा प्रवास बुलेट ट्रेनच्या माध्यमातून चार तासांमध्ये होऊ शकतो, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या प्रकल्पाला सरकारने मान्यता दिल्यानंतर यासंदर्भातील पुढील प्रक्रिया राबवण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला समांतर मार्गिकेवरुन बुलेट ट्रेनचा मार्ग काढता येईल का याची चाचपणीही सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून मुंबई-नागपूरला जोडणाऱ्या ७०० किमीच्या सहा पदरी महामार्गाचे काम वेगाने सुरु आहे. एएचएसआरसीएल आणि जपान रेल्वे ट्रॅक कन्सलटंट कंपनीदरम्यान एक महत्वाचा करार काही दिवसांपूर्वीच झाला आहे. मुंबई अहमदाबादला जोडणाऱ्या बुलेट ट्रेनच्या मार्गावरील टी थ्री पॅकेजच्या एचआरसी ट्रॅकवर्कचे काम या कंपनीला देण्यात आले आहे.