मुकेश खन्ना भडकले कंगनाच्या ‘भीक’ या वक्तव्यावर


आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच चर्चेत असते. ती बऱ्याचवेळा ट्रोल देखील होते. कंगनाने काही दिवसांपूर्वी १९४७ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य ही भीक मिळाली असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे कंगनाला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. कंगनाला यावेळी फक्त नेटकरी नाही, तर बॉलिवूड सेलिब्रिटीही ट्रोल करत आहेत. यात आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता मुकेश खन्ना यांनी कंगनावर तिच्या वक्तव्यावरून निशाना साधला आहे.


आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून मुकेश यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कंगनाचा एक फोटो देखील शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यामध्ये त्यांनी कंगनावर नाराजी व्यक्त केली आहे. मला बऱ्याच लोकांनी प्रश्न केला की आपल्या स्वातंत्र्यावर केलेल्या वक्तव्यावर तुम्ही प्रतिक्रिया का दिली नाही? जेव्हा एखादे प्रसिद्ध सेलिब्रेटी अशाप्रकारची प्रतिक्रिया देतात, तेव्हा वाईट वाटते. सरकारप्रती लाळघोटेपणा करणारेच अशाप्रकारे बोलू शकतात. पद्म पुरस्कार मिळाल्यानंतर जे काही झाले, ते अज्ञानी लोकांची लक्षणे आहेत. पण हे सगळ्यांना माहित आहे आणि सगळ्यांचा विश्वास आहे की आपल्याला स्वातंत्र्य हे १५ ऑगस्ट १९४७ रोजी मिळाले आहे. याला वेगळा काही रंग आणि अर्थ देण्याचा जो काही प्रयत्न करण्यात येतो आहे, तो चूकीचा असल्याचे मुकेश खन्ना म्हणाले.

मुकेश खन्ना पुढे म्हणाले, पण मी हे देखील बोलू इच्छितो की हे बोलणे किंवा गाणे गाणे आज़ादी बिना खड़ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल.. ही गाणी वास्तविकतेपासून फार लांब आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की ब्रिटिश सरकारला पळून जाण्याची भीती जर कोणी मनात निर्माण केली असेल तर ते होते देशातील असंख्य क्रांतिकारकांचे बलिदान, सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेची भीती आणि त्यांच्याच सैनिकांचे बंड.