पंजाबमध्ये आपचे सरकार स्थापन झाल्यास प्रत्येक महिलेला महिन्याला १,००० रुपये देणार, अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा


अमृतसर – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये मोठी घोषणा केली आहे. आम आदमी पक्षाचे सरकार पंजाबमध्ये स्थापन झाल्यास पंजाबमधील १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक महिलेला महिन्याला १,००० रुपये देऊ, असे अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केले आहे. राजकीय नेत्यांकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आश्वासनांचा पाऊस पडताना दिसत आहे.

अरविंद केजरीवाल म्हणाले, जर पंजाबमध्ये २०२२ च्या विधानसभा निवडणुकीनंतर आपचे सरकार स्थापन झाले, तर आम्ही १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक महिलेला दर महिन्याला १,००० रुपये देऊ. थेट महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा होतील. एखाद्या कुटुंबात ३ महिला असतील, तरीही प्रत्येक महिलेला १,००० रुपये मिळतील. कोणत्याही सरकारने महिला सबलीकरणासाठी राबवलेला हा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम असेल.

निवृत्तीवेतन (पेंशन) ज्या वृद्ध महिलांना मिळते आहे त्यांना त्या व्यतिरिक्त हे १,००० रुपये मिळतील. सध्या पंजाबमध्ये एक नकली केजरीवाल फिरत आहे. जे काही मी जाहीर करतो, तेच ही व्यक्ती दुसऱ्या दिवशी घोषणा करते. पण, या नकली केजरीवालपासून सावध राहा. तुम्हाला दिलेली आश्वासने केवळ हा असली केजरीवालच पूर्ण करेल, असेही केजरीवाल म्हणाले. यातील नकली केजरीवाल हा टोला पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना लगावला.