एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन गोपीचंद पडळकर परिवहन मंत्र्यांवर बरसले


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या बैठकीवर बोलताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. रोज तेचतेच शिळे अनिल परब बोलत आहेत, नवीन सांगायला त्यांच्याकडे काहीच नाही. आझाद मैदानावर त्यांनी येऊन एसटी कर्मचाऱ्यांशी बोलावे,अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली. तसेच आझाद मैदानावर बसलेले हे काय कुठले दहशतवादी आहेत का? असा सवालही टीव्ही ९ मराठीशी बोलताना केला आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले, वेळकाढूपणा आणि चालढकल करण्याचे धोरण सरकार घेत आहे. रोज एकच मंत्री अनिल परब बोलत आहेत. त्यांच्या वक्तव्यात काहीच फरक नाही. वेगळे काहीच ते सांगत नाहीत. आज एवढे महत्त्वाचे लोक बसले असतील आणि तरीही ते कालचीच वक्तव्ये करत असतील, तर बैठक घेण्यात काय अर्थ नसल्याचे वाटते. त्यांनी स्पष्ट भूमिका मांडावी. हे कर्मचारी त्यांचेच आहेत ना. त्यांनी येथे यावे आणि या कर्मचाऱ्यांशी बोलावे. हे काय कुठले दहशतवादी येथे येऊन बसले आहेत का? त्यांचेच कर्मचारी आहेत. यांचे पालकत्व त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी सरकारच्या वतीने अधिकृतपणे यावे. कर्मचारी त्यांच्याशी बोलायला तयार आहे.

आज १३ दिवस आझाद मैदानावर संप सुरू होऊन झाले आहेत. २८ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून राज्यभरात संप सुरू झाला. आज २२ नोव्हेंबर ही तारीख आहे. म्हणजे हे सरकार किती असंवेदनशील आहे हे स्पष्ट होते. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेला हा एसटीचा विषय आहे. असे असूनही मुंबईत संप सुरू झाल्यानंतर १३ व्या दिवशी बैठक घेतली. संप झाल्यापासून आज २५ दिवस झाले आहेत. यानंतरही निर्णय नाही. हे सरकार निर्णयक्षम नाही, यांच्यात एकमत नाही. एसटीत यांचा फार जीव गुंतलेला दिसतो, असे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.

गोपीचंद पडळकर म्हणाले, परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून जोपर्यंत सरकारची सुस्पष्ट भूमिका येत नाही, तोपर्यंत त्यावर बोलणे उचित होणार नाही. संप सुरू झाला आणि हे प्रकरण न्यायालयात गेले, तेव्हापासून अनिल परब समितीबाबत एकच वाक्य सांगत असल्यामुळे तेच तेच दररोज शिळे सांगणे याला काही अर्थ नाही. कर्मचारी विलिनीकरणाची मागणी करत आहे. त्यांना दुसरे-तिसरे काहीच नको आहे. त्यावर सरकार न्यायालयाचा मुद्दा सोडून काही बोललेले नाही.

स्पष्टपणे सरकारच्या वतीने सांगितले पाहिजे. मध्यममार्ग आम्ही काढणार आहोत का? आमच्या हातात मार्ग काढणे असते, तर आम्ही १३ दिवस आझाद मैदानावर झोपलो असतो का? आम्ही लोकांचे प्रश्न मांडतो आहे. त्यावर मायबाप सरकारने बोलायचे आहे. सरकारने विलिनीकरणाची भूमिका स्पष्ट करावी. तोपर्यंत कर्मचारी काय बोलणार आहेत? असा सवालही पडळकर यांनी केला.