अल्गोरिदमद्वारे मुलांना फेसबुक करत आहे ट्रॅक, रिपोर्टमध्ये खुलासा


नवी दिल्ली – सोशल मीडियावर सुरक्षेचा प्रश्न गेल्या काही दिवसात ऐरणीवर आला आहे. यातून बरीच टीका फेसबुकवर झाल्यानंतर आपले नाव बदलून फेसबुकने मेटा केले. पण फेसबुकच्या जुन्या खोड्या अद्यापही कायम असल्याचे दिसत आहे. हा खुलासा फेअरप्ले अ‍ॅक्शन प्लान आणि रिसेट ऑस्ट्रेलियाच्या नव्या रिपोर्टमधून झाला आहे. विवादास्पद अल्गोरिदम वापरून फेसबुक अजूनही मुलांना ट्रॅक करत आहे. यातून तो डेटा तयार करत असून लहान मुलांशी संबंधित जाहिराती दाखवून, तो भरघोस नफाही कमवत असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.

फेसबुकने मेटा लाँच करताना त्याचे अल्गोरिदम बदलले जाईल, असे आश्वासन दिले होते. जेणेकरुन या प्लॅटफॉर्मवर मुलांचा, विशेषतः किशोरवयीन मुलांचा गैरवापर होणार नाही. पण अद्यापही मुलांवर फेसबुकचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) लक्ष ठेवत असल्याचे अहवालानुसार समोर आले आहे. मुलांच्या हितासाठी काम करणाऱ्या संस्थांनी या अहवालाच्या आधारे फेसबुकला खुले पत्र लिहून, त्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. याला फेसबुकने उत्तर देत मुलांचा डेटा ट्रॅक करत नसल्याचे उत्तर दिले आहे.

फेसबुक अद्यापही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि पाळत ठेवण्याऱ्या प्रणालीवर १८ वर्षाखालील मुलांच्या ऑनलाइन वर्तनाचा मागोवा घेण्यासाठी काम करत आहे. अमेरिकन संसदेत व्हिसलब्लोअर फ्रान्सिस होगेन यांनीही आपल्या साक्षीमध्ये फेसबुक नफा कमावण्यासाठी मुलांचा वापर करत असल्याचा आरोप केला होता. फेसबुक १८ वर्षाखालील मुलांना त्याच्या अ‍ॅपचे भविष्यातील वापरकर्ते म्हणून पाहते. या आरोपांमुळे फेसबुकला मुलांचे इंस्टाग्राम अ‍ॅप लॉन्च पुढे ढकलावे लागले आहे.